‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या मोस्ट अवेटेड आगामी ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या होत्या. ‘दृश्यम २ ‘च्या सुपर-सक्सेसनंतर, अजय पुन्हा एकदा ‘भोला’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अजय देवगणच्या आगामी अॅक्शन-थ्रिलरबद्दल रिलीजपूर्वी बरीच चर्चा होती. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली.
नुकताच ‘भोला’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला मिश्र प्रतिसाद दिला आहे. अजय देवगणच्या भोलाचं बजेट हे जवळपास १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. याबरोबरच ‘भोला’चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. हा चित्रपट पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणार हे बऱ्याच तज्ञांनी स्पष्ट केलं होतं आणि त्यांची ही शक्यता खरी ठरली आहे.
‘भोला’चे सकाळचे शो आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद हा तसा ठीकठाकच होता, पण नंतर मात्र प्रेक्षकांनी या शोजसाठी गर्दी केली. याबरोबरच रामनवमीची सुट्टी असल्याचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला. मीडिया रीपोर्टनुसार ‘भोला’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटींची कमाई केली आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यातही ‘भोला’ने जबरदस्त कामगिरी केल्याचं स्पष्ट झालं आहे.
अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याबरोबरच हा चित्रपट ३डी मध्येसुद्धा उपलब्ध आहे. येणाऱ्या विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.