‘बधाई हो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रवींद्रनाथ शर्मा यांचा आगामी ‘मैदान’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे पहिल्यांदा नव्हे तर चक्क सातव्यांदा घडत आहे. दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर बेतलेला हा चित्रपट पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे.
या चित्रपटाशी जोडलेल्या एका व्यक्तीने याबद्दल खुलासा केला आहे. त्या व्यक्तीने सांगितले, ” ‘मैदान’ हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अजय देवगण यात प्रसिद्ध कोच सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शक अमित शर्मा यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.”
आणखी वाचा : “नऊ दिवस मी गाडीच्या टपावर झोपलो…” ‘जुबिली’ फेम प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
इतकंच नव्हे तर दिग्दर्शकाने जगभरातील फुटबॉलपटूंना आमंत्रित केलं आहे आणि त्यांच्याबरोबर एक फुटबॉल सीरिजदेखील आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय खेळाडू या वेगवेगळ्या देशांबरोबर फुटबॉल खेळणार आहेत. या सामन्याचं चित्रण आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार असून यासाठी दिग्दर्शक आणि संपूर्ण चित्रपटाची टीम प्रचंड मेहनत घेत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
‘मैदान’ हा चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार होता, पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलल्याचं म्हटलं जात आहे. ‘भोला’ आणि ‘दृश्यम २’ या चित्रपटांनंतर अजय देवगणच्या या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.