रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून या चित्रपटात कलाकारांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अजय देवगण आणि करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेतच. शिवाय ‘सूर्यवंशी’ आणि ‘सिंबा’ म्हणजेच अक्षय कुमार व रणवीर सिंहसुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. मध्यंतरी या चित्रपटाचा एक जबरदस्त अॅक्शन सीन शूट झाल्याचं करीनाने तिच्या पोस्टमध्ये शेअर केलं होतं.
इतकंच नव्हे तर या चित्रपटात आणखी बरीच सरप्राइजेस आहेत. दीपिका पदूकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूरसुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून या कॉप युनिव्हर्सशी जोडले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दीपिका, रणवीर आणि टायगरचा धासु लुक समोर आला होता. त्यापाठोपाठ अजय देवगणचा लुकही रोहित शेट्टीने शेअर केला ज्याची खूप चर्चा झाली. आता ‘सिंघम अगेन’च्या सेटवरुन एक वाईट बातमी समोर आली आहे.
आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये भाव खाऊन गेला ‘हा’ मराठी अभिनेता, अजय-अतुलच्या गाण्यानेही वाढवली रंगत
विले पार्ले येथे ‘सिंघम अगेन’च्या एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त समोर येत आहे. ‘मिड-डे’च्या रिपोर्टनुसार एका अॅक्शन कॉम्बेट सिक्वेन्सचं चित्रीकरण करतानाच हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काही वेळ उपचार घेऊन विश्रांती घेऊन अजय देवगणने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे.
‘सिंघम अगेन’चं चित्रीकरण सुरू झालं असून मुंबईचा यश राज स्टुडिओ आणि हैद्राबादमधील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तसेच आता लवकरच या चित्रपटाचा जबरदस्त क्लायमॅक्स चित्रित होणार आहे ज्यावर तब्बल २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘सिंघम अगेन’ प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’सुद्धा येणार आहे. अद्याप कोणत्याही निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबद्दल भाष्य केलेलं नाही.