Shaitaan Box office collection: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपट ८ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या ५ दिवसांतच चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटात पहिल्यांदाच अजय देवगण आणि आर माधवनची जोडी पाहायला मिळाली. आजपर्यंत नायक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आर माधवनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे.
एका आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केल्यानंतर मंडे टेस्टमध्ये चित्रपटाच्या कमाईमध्ये घट पाहायला मिळाली. मंगळवारी चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण ही कायम असल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी चित्रपटाने ७.२५ कोटींची कमाई केली. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार मंगळवारी चित्रपटाने सोमवारएवढीच म्हणजेच ६.७५ कोटींची कमाई केली. अजय देवगणच्या ‘दृश्यम २’च्या तुलनेत या चित्रपटाने तशी फार चांगली कामगिरी केलेली नाही.
आणखी वाचा : सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या जबरदस्त अॅक्शनने भरपुर असा बहुचर्चित ‘रुस्लान’चा टीझर प्रदर्शित
सध्या बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट नसल्याने ‘शैतान’ची कमाई चांगली होत आहे. १५ मार्चपर्यंत ‘शैतान’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो, परंतु १५ मार्चला सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ आल्यानंतर याच्या कमाईत फरक पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘शैतान’ने आत्तापर्यंत संपूर्ण भारतात ६८ कोटींची कमाई केली असून जगभरात ८८ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अजय देवगण आणि आर माधवनचा ‘शैतान’ हा ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रीमेक आहे. ‘वश’ १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. ‘वश’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जानकी बोडीवालाने ‘शैतान’मध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हे दोन्ही चित्रपट काळी जादू, वशीकरण आणि अंधविश्वासावर आधारित आहे.