करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अजय देवगण आणि चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी पाहुणे म्हणून पोहोचले होते. या एपिसोडमध्ये अजयने त्याच्या आयुष्यातील अडचणींबद्दल मोकळेपणानं सांगितलं. तसेच त्याचे वडील वीरू देवगण हे एका गल्लीतील गँगचे सदस्य होते. त्यांना ज्येष्ठ अॅक्शन डायरेक्टरने रस्त्यावर भांडताना पाहिलं आणि काम करण्याची संधी दिली होती, असा खुलासा केला.
अजय देवगणने सांगितलं की त्याचे वडील १३ वर्षांचे असताना पंजाबमधील घरातून पळून गेले होते. ते रेल्वेचे तिकीट न घेता मुंबईत आले होते. त्यासाठी त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे काम नव्हतं आणि खायला अन्नही नव्हतं. पण कोणीतरी त्यांना मदत केली आणि सांगितलं की जर त्यांनी धुवून दिली तर ते त्या कारमध्ये झोपू शकतात. तिथून त्याची कहाणी सुरू झाली. यानंतर वीरू सुतार बनले आणि त्यानंतर ते गुंड बनले. त्यांची एक टोळी होती आणि ते त्या टोळीकडून लोकांशी भांडायचे. हे ऐकून करण जोहर आश्चर्यचकित झाला.
अजय पुढे म्हणाला, “एक दिवस एक खूप मोठे दिग्दर्शक श्री रवी खन्ना तिथून जात होते आणि त्यांनी रस्त्यात भांडण होत असल्याचं पाहिलं. त्यांनी गाडी थांबवली आणि भांडण संपल्यावर माझ्या बाबांना बोलावलं. त्यांनी विचारलं. ‘तू काय करतो?’ माझे वडील म्हणाले की ते सुतारकाम करतात. मग रवी खन्ना त्यांना म्हणाले, ‘तू खूप चांगला भांडतोस, उद्या मला भेटायला ये.’ त्यांनी माझ्या वडिलांना फायटर बनवलं.”
रोहित शेट्टीचे वडीलही घरातून पळून आले होते
अजय देवगणची कहाणी ऐकल्यानंतर रोहित शेट्टीने त्याच्या वडिलांबाबत सांगितलं. त्यांचीही कहाणी अशीच असल्याचा खुलासा त्याने केला. रोहित म्हणाला की त्याचे वडीलही १३व्या वर्षी घरातून पळून मुंबईला आले होते. इथे त्यांनी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. यानंतर त्यांनी बॉडी बिल्डिंग सुरू केले आणि त्यांच्या उंचीमुळे त्यांना सिनियर अॅक्शन डायरेक्टरची नोकरी मिळाली. रोहित शेट्टी हा दिवंगत अॅक्शन मास्टर एमबी शेट्टी यांचा मुलगा आहे.