Raid 2 Movie Trailer: सहा वर्षांपूर्वी २०१८मध्ये अजय देवगणचा ‘रेड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘रेड’मध्ये अजय देवगण व सौरभ शुक्ला यांच्यातील द्वंद प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडलं होतं. तेव्हापासून ‘रेड’ चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अखेर ‘रेड २’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये अजय देवगणपेक्षा रितेश देशमुख चांगलाच भाव खाऊन गेला आहे. त्यामुळे रितेशचं भरभरून कौतुक होतं आहे.

‘रेड २’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला अजय देवगणने साकारलेल्या अमय पटनायकची एन्ट्री पाहायला मिळत आहे. त्यानंतर अमय, दादा मनोहर भाई म्हणजे खलनायक रितेश देशमुखच्या घरावर छापेमारी करण्यासाठी पोहोचलेला दाखवण्यात आला आहे. यावेळीही छापेमारीत काही मिळत नाही. पण शेवटी चित्रपटाच्या कथेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

संपूर्ण ‘रेड २’च्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुख अजय देवगणवर भारी पडल्याचं चित्र दिसत आहे. यामध्ये सौरभ शुक्ला जेलमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच सुप्रिया पाठक वृद्ध महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमधील प्रत्येक सीनमध्ये सस्पेन्स आहे. तर अजय व रितेश यांच्यातील शा‍ब्दिक युद्धाने ट्रेलर आणखी धमाकेदार झाला आहे. ट्रेलरमध्ये तमन्ना भाटियाच्या आयटम साँगची झलक पाहायला मिळत आहे.

‘रेड २’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्याने रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “रितेशला नक्कीच खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कार मिळेल.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “रितेश देशमुखच्या दमदार अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “जेव्हा रितेश खलनायकाची भूमिका साकारतो, तेव्हा मला लगेच कळतं काहीतरी खास असणार आहे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, रितेशची भूमिका पूर्ण चित्रपटाचा जीव असणार आहे.

दरम्यान, ‘रेड २’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार आणि गौरव नंदा यांनी सांभाळली आहे. तसंच राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख व्यतिरिक्त वीणा कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. १ मेला ‘रेड २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.