अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. नुकताच ‘भोला’चा धमाकेदार ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
जवळपास २ मिनिटं ३३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अजय व तब्बूचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. अॅक्शन सीन्स, क्राइम थ्रीलर असा हा चित्रपट असल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये अजयसह तब्बू भलतीच भाव खाऊन गेली आहे. शिवाय ट्रेलरच्या बॅकग्राऊंड म्युझिकने लक्ष वेधून घेतलं आहे. या ट्रेलर लॉंचदरम्यान अजय देवगणने या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : एक्स बॉयफ्रेंडकडून छळ, सुजलेले डोळे, शरीरावर गंभीर जखमा; अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत मांडली व्यथा
याबरोबरच ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर ज्या पद्धतीने इतिहास रचला आहे तो इतिहास कायम ठेवायचा प्रयत्न ‘भोला’ करेल अशी आशासुद्धा अजय देवगणने व्यक्त केली आहे. अजय म्हणाला, “आपल्याकडे सध्या ‘पठाण’ हा एकमेव ब्लॉकबस्टर चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. त्यानंतर येणारा प्रत्येक चित्रपट अशीच कामगिरी करेल, ‘भोला’सुद्धा अशीच कमाई करण्यात यशस्वी होईल अशी आशा व्यक्त करतो.”
अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा तमिळ सुपरहिट ‘कैथी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते. याची कथा एका पूर्व अपराध्याच्या भोवती फिरते जो तुरुंगातून बाहेर पडल्यावर सर्वप्रथम आपल्या मुलीची भेट घ्यायला निघतो, पण ड्रग माफिया आणि पोलीस यांच्यामध्ये तो गुरफटून भरकटतो. ‘भोला’चा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. अजय-तब्बूसह राय लक्ष्मी, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.