बॉलीवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या स्टाईल व चित्रपटांमुळे कायमच चर्चेत राहत असतो. मात्र एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. २०२१ मध्ये शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला ड्रग्स केस प्रकरणात अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आर्यन पूर्ण एक महिना तुरुंगात होता. आर्यन खान कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे खान कुटुंबावर तेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला होता.
आर्यनच्या या ड्रग्स प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. अशातच आता चार वर्षांनी एजाज खानने आर्यनच्या ड्रग्स प्रकरणावर भाष्य केलं आहे. एजाज खान आजवर अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बिग बॉस सीझन ७’ मधून तो घराघरात प्रसिद्ध झाला. तो या शोचा दुसरा रनरअप होता. त्यालाही एका कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तो मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता.
त्याचवेळी शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांनाही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांनाही त्याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. अशातच एजाजने नुकत्याच एका मुलाखतीत असा दावा केला आहे की, त्याने आर्यन आणि राज यांना तुरुंगात असताना मदत केली होती. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत एजाजने याबद्दल भाष्य केलं.

आर्यनबद्दल एजाजने असं म्हटलं की, “हा…. आर्यन खानही तिथे (आर्थर रोड जेल होता. तुरुंगात मी त्याला पाणी, सिगारेट दिलं होतं. तुरुंगात तुम्ही हेच देऊ शकता. आणखी काय देणार? यामुळे त्याला गुंड-माफियांपासून वाचवू शकता”. शिवाय राज कुंद्राबद्दल त्याने असं म्हटलं की, “राज कुंद्रा मला रोज मेसेज पाठवायचा. तो पाणी, ब्रेड, बिस्किटं मागायचा. त्याला पाणी देऊ नका असं अधीक्षकांनी सांगितलं होतं. त्याला बिस्लरीचं पाणी नाही, तर सामान्य पाणी प्यायला सांगितलं होतं. आता तो ते पाणी प्यायला असता तर आजारी पडला असता.”

पुढे एजाजने राजच्या ‘UT69’ चित्रपटाविषयी म्हटलं की, “त्याची कथा खोटी होती, त्यामुळेच तो चित्रपट फ्लॉप ठरला. तुम्ही एखाद्या नायकाचे पात्र दाखवा, ज्याच्याकडून तुम्ही मदत मागितली आणि कशी मदत केली हे दाखवा”. यापुढे त्याने असं म्हटलं की, “जो वेळ त्याने माझ्यासोबत घालवला होता, तो त्याच्या पत्नी शिल्पा शेट्टीसोबतही घालवला नसता. पण आता तो मला विसरला.”