Ajmer 92 Trailer release : ‘द केरला स्टोरी’, ‘७२ हूरें’ या चित्रपटानंतर सध्या ‘अजमेर ९२’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ३१ वर्षांपूर्वी अजमेरमध्ये किशोरवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारावर आधारित या चित्रपटाचे कथानक असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
हेही वाचा : “‘गदर’च्या सेटवर सलग ३० तास काम केले” अमीषा पटेलचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “दिग्दर्शक अनिल शर्मांचे…”
‘अजमेर ९२’ चित्रपटाच्या २ मिनिट ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जवळपास २५० मुलींना त्यांचे वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना कसे ब्लॅकमेल करण्यात आले. काही मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केले गेले. तसेच या घटनांनंतर अजमेरमध्ये ३१ वर्षांपूर्वी काय परिस्थिती निर्माण झाली होती याचे कथानक दाखवण्यात आले आहे. निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये त्यावेळच्या पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे, एक कुटुंबीय एका प्रचलित पत्रकाराकडे त्यांच्या होणाऱ्या सुनेवर बलात्कार झाला आहे की नाही? याची चौकशी करण्यासाठी तिचा फोटो देतात. हे ऐकून पत्रकाराला धक्का बसतो आणि पुढे तो या संपूर्ण घटनेचा शोध घेऊ लागतो. ट्रेलरमधील काही घटना पाहून अंगावर काटा येतो. “आपण मुली आहोत हाच आपला दोष आहे” असे काही संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
हेही वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
अजमेर ९२ या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह यांनी केले आहे. तसेच याची निर्मिती नवरेश्वर तिवारी यांनी केली आहे. सध्या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट २१ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये करण शर्मा, सुमित सिंग, जरीना वहाब, ब्रिजेंद्र काळ, सयाजी शिंदे आणि मनोज जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.