बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट, चित्रपट याबाबतची माहिती अक्षय त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. याबरोबरच वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबियांबरोबरचे फोटो व व्हिडीओही अक्षय शेअर करताना दिसतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अक्षय कुमारने शेअर केलेला व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तो सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल यांच्यासह भांगडा डान्स करताना दिसत आहे. अक्षय कुमार व मोहनलाल यांच्या भांगडा डान्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
अक्षयने मोहनलाल यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर करत ‘अविस्मरणीय क्षण’ असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओला त्याने “मोहनलाल सर, तुमच्याबरोबर केलेला हा भांगडा डान्स कायमच माझ्या लक्षात राहील. माझ्यासाठी हे अविस्मरणीय क्षण आहेत”, असं कॅप्शन दिलं आहे.
मोहनलाल हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. ‘दृश्यम’, ‘दृश्यम २’, ‘लुसिफर’ यांसारखे हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. मल्याळम चित्रपटांसह त्यांनी तेलुगु, तमिळ, हिंदी व कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेली ४० दशके ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी २००१ साली त्यांना पद्मश्री तर २०१९ला पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.