भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान पान मसाल्याची एक जाहिरात प्रसारित करण्यात आली. यामध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार दिसत होते. अक्षयवर गेल्या वर्षी पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे खूप टीका झाली होती. त्यानंतर त्याने माफी मागत यापुढे अशा उत्पादनांची जाहिरात करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याची ही रविवारी प्रदर्शित झालेली जाहिरात पाहून नेटकरी त्याच्यावर टीका करू लागले. यावर अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”
अक्षय कुमारने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ‘विमल पान मसाल्याचा अॅम्बेसेडर म्हणून अक्षय कुमार परतला’, अशा मथळ्याने बातमी देणाऱ्या एका वेबसाईटला जोरदार सुनावलं. “अॅम्बेसेडर म्हणून परतला? जर तुम्हाला खोट्या बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये स्वारस्य असेल तर काही फॅक्टचेक मी तुम्हाला सांगतो. या जाहिराती १३ ऑक्टोबर २०२१ रोजी शूट केल्या गेल्या होत्या. मी जाहीरपणे अशा उत्पादनांचं समर्थन करणार नाही, अशी घोषणा केल्यापासून माझा ब्रँडशी काहीही संबंध नाही. ते आधीच शूट केलेल्या जाहिराती कायदेशीररीत्या पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत चालवू शकतात. आता शांत व्हा आणि काही खऱ्या बातम्या द्या,” असं अक्षयने म्हटलं आहे.
दरम्यान, अक्षयने मागच्या वर्षी पान मसाला ब्रँडची जाहिरात केली होती. त्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मग अक्षयने जाहीरपणे माफी मागितली होती. तसेच यापुढे असा कोणत्याही उत्पादनांचं समर्थन किंवा जाहिरात आपण करणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.