‘हेरा फेरी’मधून बाहेर पडल्याच्या वृत्तामुळे अक्षय कुमार हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहतेसुद्धा यामुळे बरेच नाराज आहेत. याबरोबरच यावर्षी अक्षय कुमारचे एका पाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्याने त्याला बरंच ट्रोल केलं जात आहे. मध्यंतरी त्याने या ट्रोलिंगला उत्तरदेखील देण्याचा प्रयत्न केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच अक्षयने सौदीमध्ये सुरू असलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या विषयाबद्दल भाष्य केलं आहे. अक्षय लवकरच लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर मुद्द्याला चित्रपटाच्या माध्यमातून हात घालणार आहे. या महोत्सवात अक्षयने याबद्दल स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा : आमिर खानने केलेलं ‘या’ मुकपटात काम; नीना गुप्ता होत्या प्रेयसीच्या भूमिकेत तर आलोक नाथ यांनी साकारला खलनायक

मॉडरेटर कलीम आफताबशी संवाद साधताना अक्षय म्हणाला, “हा अत्यंत खूप महत्त्वाचा विषय आहे, बऱ्याच ठिकाणी याची दखल घेतली जात नाही. आपण शाळेत सगळे विषय शिकतो, पण लैंगिक शिक्षण हा एक असा विषय आहे जो या जगातील प्रत्येक शाळेत शिकवला गेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. यावर मी चित्रपट काढणार आहे, फक्त तो प्रदर्शित व्हायला नक्कीच थोडा जास्त वेळ लागणार आहे. पण तो माझा सर्वोत्तम चित्रपट असेल.”

पुढे अक्षय म्हणाला, “मला हे असे सामाजिक संदेश देणारे चित्रपट करायला फार आवडतं. व्यावसायिक चित्रपटाप्रमाणे त्याला यश मिळत नाही, पण असा चित्रपट करून माझ्या मनाला समाधान मिळतं.” अक्षयने याआधीही ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट केले आहेत आणि त्यांना चांगलंच यश मिळालं होतं. आता अक्षय ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटात झळकणार आहे शिवाय तो एका तमिळ चित्रपटाच्या रिमेकवरही काम करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar confirms about his next film which will handle a big social issue avn