बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या अभिनयाने सिनेविश्वात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. अक्षयने २००१ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केलं. ट्विंकलबरोबर लग्न करण्याआधी बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींसह त्याचं नाव जोडलं जात होतं.
ट्विंकलबरोबर लग्न होण्याआधी अक्षय कुमार बॉलीवूड अभिनेत्री शीबा आकाशदीपला डेट करत होता. त्यावर नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शीबा आकाशदीपने अक्षय कुमार आणि तिच्या नात्याबद्दल काही वक्तव्ये केली आहेत. ‘मिस्टर बॉण्ड’ चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यावेळीच त्यांच्यात मैत्री आणि आपुलकी निर्माण झाली. त्यांची आवडनिवडसुद्धा सारखी होती. मात्र, ब्रेकअप झाल्यावर दोघेही एकमेकांचे मित्र म्हणूनही राहू शकले नाही, असं शीबा आकाशदीपने सांगितलं आहे.
शीबाने नुकतील ‘पिंकविला’ला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिला तू कधी अक्षय कुमारला डेट करत होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही तरुण असता आणि एकमेकांबरोबर काम करत असता तेव्हा असं होतं (तुम्ही प्रेमात पडता).” नात्याबद्दल शीबाला पुढे विचारण्यात आलं की, तुमच्या दोघांमध्ये लगेचच सर्वकाही समान जाणवले आणि तुम्ही मित्र झाले का? त्यावर उत्तर देताना ती हो म्हणाली. तसेच तिने दोघांचे कुटुंबीय एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याचंही सांगितलं. ती म्हणाली, “दोघांनाही फिटनेसचं फार वेड होतं. तसेच कौटुंबिक मैत्रीही होती. माझी आजी आणि त्याची आई दोघी एकत्र ताश हा खेळ खेळायच्या.”
दोघं एकमेकांपासून वेगळे कसे झाले? त्यांच्यात काय वाद झाले? असे प्रश्न पुढे शीबाला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “त्यावेळी आम्ही दोघेही फार लहान होतो. मी यावर कधीच काही बोलत नाही. त्यावर फार बोलण्यासारखं काहीही नाही. तसेच मला आता तेव्हाच्या गोष्टी फार लक्षातही नाहीत. कारण तीन दशकांहून याला जास्त वेळ झाला आहे.”
“तुम्ही जेव्हा लहान असता आणि अशा गोष्टी घडतात, तेव्हा तुम्ही सर्वात जास्त भावूक होता. तुम्ही यातून इतके दुखावले जाता की, त्यानंतर तुम्हाला स्वत:ला नॉर्मल ठेवणं कठीण होतं. तरुणांनो प्रेमात फार ताकद असते. याने तुम्ही भावूक तर होताच तसेच याने रागीटही होता. असे घडते तेव्हा मैत्रीही टिकत नाही”, असंही शीबाने पुढे सांगितलं आहे.