अभिनेता अक्षय कुमारचे यावर्षी तब्बल ५ चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी ४ थेट चित्रपटगृहात आणि एक ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला. यापैकी एकही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. अक्षय कुमारची काम करण्याची पद्धत. ४० दिवसांत चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण करणं, त्याचं शिस्तबद्ध वागणं यावरुन बऱ्याचदा चर्चा होते. आता मात्र या सगळ्यावर मत व्यक्त करणाऱ्यांचा अक्षयलाच कंटाळा आला आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समीट २०२२’ या कार्यक्रमात संवाद साधतांना अक्षयने याविषयी खुलासा केला आहे. चित्रपटसृष्टीतील बरेच लोक अक्षयच्या शिस्तबद्ध स्वभावाची खिल्ली उडवतात. नुकतंच दिग्दर्शक बोनी कपूर यांनीही अक्षयच्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्याच्या पद्धतीवर टिप्पणी केली होती. याबद्दलच अक्षयने या हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना याबाबत खंत व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : ‘हेरा फेरी ३’ मधून अक्षय कुमार बाहेर का पडला? ‘हे’ असू शकतं कारण
काम करण्याच्या पद्धतीवरून बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “इथे उपस्थित असलेली किती मंडळी त्यांच्या मुलांना प्रश्न विचारतात की बाबा तू एवढं काम का करतो? एखादी वाईट सवय असेल तर प्रश्न विचारणं योग्य आहे जसं की एखादी व्यक्ति खूप जुगार खेळत असेल किंवा खूप दारू पित असेल तर त्या व्यक्तीला प्रश्न करणं योग्य आहे. पण मन लावून जास्त काम करणाऱ्या व्यक्तीला कुणी का प्रश्न विचारावा?”
शिवाय अक्षय वर्षाला जे काम करतो त्याबद्दल बोलताना म्हणाला, “हो मी वर्षाला ४ चित्रपट करतो, मी जाहिराती करतो, पण मी हे काम कोणापासून हिरावून घेऊन तर करत नाही ना. मला समजत नाही कित्येक पत्रकार मला विचारतात की तुम्ही लवकर का उठता? पण सकाळ ही लवकर उठण्यासाठीच असते. ते मला विचारतात तू लवकर का झोपतोस? अरे पण मूर्खांनो रात्री सर्वसामान्य माणूस हा झोपतोच. मला नेमकं कळत नाही मी काही चुकीचं करतोय? कोणाला काम करायला आवडणार नाही? मी वर्षाला ४ चित्रपट करणार, त्यासाठी गरज असेल तर ५० दिवस मी ददेईन किंवा अगदीच अत्यावश्यक असेल तर मी ९० दिवसही त्यासाठी द्यायला तयार आहे.”
शिवाय अक्षयच्या ४० दिवसांत चित्रपट पूर्ण करण्याच्या संकल्पनेचा चुकीचा अर्थ बऱ्याच लोकांनी घेतला असल्याचंही अक्षयने म्हंटलं आहे. यावर्षी अक्षयचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतु’ आणि कटपुतली ही चित्रपट प्रदर्शित झाले.