‘खिलाडी’ म्हणून प्रचलित असलेल्या सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय व टायगर यांची जोडी सध्या अनेक मुलाखतींमध्ये पाहायला मिळतेय. त्यानिमित्तानं अक्षयनं एका चित्रपटातील आठवण शेअर केली आहे; ज्यात एका शूटिंगदरम्यान त्याला मोठी दुखापत झाली होती.
१९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपटाच्या फाईट सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान अक्षयला स्लिप डिस्कचा त्रास झाला होता. रणवीर इलाहाबादियाच्या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं सांगितलं की, त्याला ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपट नेहमी लक्षात राहतो आणि यामागचं कारण हे नाही की तो चित्रपट सुपरहिट ठरला होता. तर याचं कारण हे आहे की, या चित्रपटामुळे अक्षयच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती.
हेही वाचा… सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर टायगर श्रॉफ म्हणाला, “माझ्या आयुष्यात एकच दिशा…”
मुलाखतीत अक्षय म्हणाला, “मला आणि माझ्या पाठीला हा चित्रपट कायमचा लक्षात राहिला आहे. मी अंडरटेकर ही भूमिका बजावणाऱ्या एका रेसलरला उचललं होतं आणि त्याचं वजन ४२५ पाउंड म्हणजेच १९२ किलो होतं. मी तेव्हा वेडा झालो होतो. मी ठरवलेलं की, याला मी उचलणार.”
अक्षयनं तो स्टंट केला आणि सीन शूट झाला. तीन दिवसांनंतर त्याला जाणवलं की, पाठीत कसला तरी त्रास होतोय. तेव्हा त्याला ‘स्लिप डिस्क’चा त्रास झाला असल्याचं कळलं.
हेही वाचा… ज्या घरात ५०० रुपये भाड्याने राहायचा अक्षय कुमार, आता तेच विकत घेणार; बालपणीची आठवण सांगत म्हणाला…
२०२१ रोजी ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाली होती, तेव्हा अक्षयनं माहिती शेअर करून सांगितलं होतं की, या चित्रपटात स्टार रेसलर अंडरटेकर नसून ब्रायन लीनं त्याची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा… बॉक्स ऑफिसच्या अपयशासाठी महिला जबाबदार? क्रिती सेनॉन स्पष्टच म्हणाली, “… दोष मुलींना देतात”
दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या आगामी चित्रपटात अक्षय टायगर श्रॉफबरोबर झळकणार आहे. मानुषी छिल्लर, अलाया फर्निचरवाला, पृथ्वीराज सुकुमारन, रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.