राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत भाविकांची गर्दी झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची मंदिरातील गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या सोहळ्यानिमित्त रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन, रोहित शेट्टी, कंगना रणौत असे अनेक कलाकार अयोध्येला पोहोचले आहेत. कंगनाने अयोध्येत राम मंदिराबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तर अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
“आज मी अयोध्या नगरीमध्ये आले आहे आणि असं वाटतंय जणूकाही मी पौराणिक काळात पोहोचले आहे. जसं आपण पौराणिक कथांमध्ये वाचायचो की त्या काळात कसे मोठे भवन असायचे, यज्ञ व्हायचे, जिथे देव गंधर्व संपूर्ण सृष्टीशी संबंधित आहेत, ते यायचे. हा अद्भूत आणि अलौकिक अनुभव आहे. योगींच्या सरकारने उत्तर प्रदेशचा कायापालट केला आहे. फक्त विकासच नाही तर आध्यात्माच्या दृष्टीकोनातूनही रोमच्या व्हेटिकन सिटीपेक्षा अयोध्या संपूर्ण जगात ओळखली जाईल,” असं कंगना रणौत म्हणाली.
अक्षय कुमारने व्हिडीओ शेअर करत सर्वांना आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत त्याच्याबरोबर टायगर श्रॉफदेखील आहे. आजच्या या सोहळ्यासाठी अक्षय कुमार अयोध्येला जाणार नाही, कारण तो टायगर श्रॉफबरोबर चित्रपटाचं शूटिंग करत आहे.
Video: “प्रभू श्रीराम यांच्याआधी…”, अनुपम खेर यांनी हनुमान गढी मंदिरात दर्शन घेतल्यावर केले विधान
अक्षय कुमार म्हणाला, “आजचा दिवस जगभरातील राम भक्तांसाठी खूप मोठा आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजचा दिवस उजाडला आहे, अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला त्यांच्या घरी येत आहेत.” यानंतर टायगर श्रॉफ म्हणतो, “आपण सर्वांनी लहानपणापासून याविषयी खूप काही ऐकलं आहे, पण आज हा दिवस पाहायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण सर्वजण त्या क्षणाची वाट पाहत आहोत जेव्हा आपण दिवा लावून श्री रामाची पूजा करू आणि रामाचा उत्सव साजरा करू. दोघांकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्री राम.”
दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी अयोध्येला पोहोचत आहेत. अमिताभ बच्चन, चिरंजीवी, राम चरण, जॅकी श्रॉफ, राजकुमार हिरानी, मधुर भांडारकर ही मंडळी मंदिराच्या आवारात पोहोचली आहे.