यंदाची दिवाळी अक्षय कुमार, अजय देवगणसाठी अनलकी ठरली आहे असंच म्हणावं लागेल. या दोन्ही सुप्रसिद्ध अभिनेत्यांचे चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. अक्षयचा ‘राम सेतू’ व अजयचा ‘थँक गॉड’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळणार असं बोललं जात होत. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. आता या दोन्ही चित्रपटांवर रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट भारी पडला आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, चित्रपटगृहाच्या मालकांनी ‘कांतारा’ला ‘राम सेतू’ व ‘थँक गॉड’ चित्रपटापेक्षा अधिक शो द्यायचे ठरवले आहेत. कारण या दोन्ही चित्रपटांना ‘कांतारा’पेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे. शिवाय ‘कांतारा’ चित्रपटाची तिकिट किंमतही अगदी कमी आहे.
‘राम सेतू’ पेक्षा ४० टक्क्यांनी तर ‘थँक गॉड’पेक्षा ३० टक्क्यांनी ‘कांतारा’च्या तिकिटाचं दर कमी आहे. सोमवारी (३१ ऑक्टोबर) या दोन्ही चित्रपटांचे शो रद्द झाले. हिंदी भाषेमध्ये ‘कांतारा’ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत.
आणखी वाचा – मुलांना शाळेतून घरी आणताना सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या गाडीला अपघात, मुलगी रुग्णालयात दाखल
‘राम सेतू’ने आतापर्यंत फक्त ५६ कोटी रुपये कमाई केली आहे. तर ‘थँक गॉड’ने २९ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. पण ‘कांतारा’बाबात काही वेगळंच गणित पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. फक्त १५ कोटी रुपयांचा बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.