यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास ठरली. कारण २५ ऑक्टोबरला (मंगळवारी) दोन बिग बजेट हिंदी तर एक मराठी ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. अक्षय कुमारचा ‘राम सेतु’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना हिंदी चित्रपटांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. अक्षयच्या ‘राम सेतु’ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी केली. मात्र आता या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
आणखी वाचा – “वाद निर्माण होईल असं…” शरद केळकर स्पष्टच बोलला, अजय देवगणबाबतही महत्त्वाचं विधान
‘राम सेतु’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. प्रदर्शनापूर्वीच अक्षयचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ‘राम सेतु’ला प्रेक्षकांच्या कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईवरून ‘राम सेतु’ सुपरहिट ठरणार असं बोललं जात होतं. पण आता चित्र बदलेलं दिसत आहे.
‘राम सेतु’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ११ कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी ८ कोटी २० लाख रुपये कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३४ कोटी २० लाख रुपये इतपत कमाई केली आहे. दिवाळीनिमित्त प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसल्याचं दिसत आहे.
आणखी वाचा – “मला रात्री झोप येत नाही तेव्हा…” नवऱ्याविषयी बोलताना कतरिना कैफने उघड केलं बेडरुम सिक्रेट
‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर ‘राम सेतु’कडून प्रेक्षकांना अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटाच्या कमाईमध्ये अशीच घसरण होत राहिली तर ‘राम सेतु’ १०० कोटीपर्यंत तरी पोहोचणार का? अशी शंका निर्माण होत आहे.