अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)वर गुरुवारी पहाटे १६ जानेवारीला हल्ला झाला होता. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. एक अनोळखी व्यक्ती गुरुवारी पहाटे अभिनेत्याच्या वांद्रे पश्चिम येथील घरात घुसली होती. त्यानंतर सैफ अली खान व ती व्यक्ती यांच्यामध्ये झालेल्या झटापटीत सैफ अली खानला दुखापत झाली. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. मनोरंजन विश्वासह राजकीय वर्तुळातूनही अभिनेत्याच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळत होते. आता अभिनेता अक्षय कुमारने सैफ अली खानच्या हल्ल्यावर एका कार्यक्रमात वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तो खूप धाडसी…

अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘स्काय फोर्स’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका कार्यक्रमात सैफ अली खानबद्दल बोलताना त्याने म्हटले, “तो सुरक्षित आहे ही खूप चांगली बाब आहे. आम्ही आनंदी आहोत. तो सुरक्षित असल्याने संपूर्ण इंडस्ट्रीला खूप आनंद झाला आहे. त्याने त्याच्या कुटुंबाचे संरक्षण केले, तो खूप धाडसी आहे. त्यासाठी त्याला सलाम आहे.” पुढे मजेशीरपणे त्याने म्हटले की, जर भविष्यात त्यांनी एकत्र चित्रपट केला, तर त्याचे टायटल ‘दो खिलाडी’ असे असेल. अक्षय कुमारने म्हटले, “मी त्याच्याबरोबर ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा चित्रपट केला आहे. पण, जर भविष्यात जर आम्ही एकत्र चित्रपट केला, तर त्याचे नाव ‘दो खिलाडी’ असे असेल.”

मैं खिलाडी तू अनाडी हा चित्रपट १९९४ ला प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अक्षय कुमार व सैफ अली खान यांच्याबरोबरच मुकेश खन्ना, कादर खान, शिल्पा शेट्टी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. समीर मलकार दिग्दर्शित हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता.

आणखी एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनाही सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी या घटनेला दुर्दैवी म्हणत अभिनेत्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच अभिनेता ज्युनिअर एनटीआरनेदेखील सैफवरील हल्ल्यानंतर एक्सवर पोस्ट करीत या घटनेबद्दल ऐकल्यानंतर धक्का बसला असून, अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करीत असल्याचे त्याने म्हटले होते. पूजा भट्टने याआधी कधीही इतके असुरक्षित वाटले नव्हते, अशा आशयाची पोस्ट एक्सवर शेअर केली होती.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला रविवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. सध्या तो लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar reacts to attack on saif ali khan says he protected his family and hats off to him for that also shares if we do a film together it will be a called do khiladi nsp