अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे फारच चर्चेत आहे. एकीकडे ‘हेरा फेरी 3’मध्ये अक्षय दिसणार नसल्याने चाहते नाराज आहेत. तर दुसरीकडे ‘हेरा फेरी ३’ पाठोपाठ आणखी ३ चित्रपटातून त्याचा पत्ता कट झाला असल्याचं समोर आलं आहे. पण अशातच त्याचे चाहते आणखी निराश होऊ नये म्हणून त्याने त्याच्या एका आगामी चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणजे त्याचा एक आगमी चित्रपट लैंगिक शिक्षणाचे महत्व पटवून देणार आहे.
नुकतंच अक्षयने सौदीमध्ये सुरू असलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या विषयाबद्दल भाष्य केलं आहे. त्याने सांगितलं, “माझा आगामी चित्रपट हा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा चित्रपट असेल. हा एक कोर्टरूम ड्रामा असून एक नागरिक शाळेमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करावे यासाठी कोर्टात धाव घेतो असे दाखवण्यात येणार आहे.”
आणखी वाचा : कार्तिक आर्यन बॉलिवूडनंतर आता दक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकण्यासाठी सज्ज, म्हणाला…
हे बोलताना अक्षयने चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. परंतु ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार अक्षय ज्या चित्रपटाबद्दल बोलत होता तो चित्रपट म्हणजे ‘ओह माय गॉड २.’
अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याचा दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. ‘ओह माय गॉड’ या चित्रपटात अक्षय कुमारबरोबरच परेश रावल यांची महत्वपूर्ण भूमिका होती. हा चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमारनेच केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट मे २०२३ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. २०२२ मध्ये अक्षयचे जे चित्रपट प्रदर्शित झाले ते बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण त्याचा हा चित्रपट उत्तम कामगिरी करेल अशी निर्मात्यांना आशा आहे.