अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ चित्रपट शुक्रवारी (६ ऑक्टोबर रोजी) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सरदार जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने बायोपिक करण्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच बायोपिक चित्रपट हे मसालापटांइतकी कमाई कधीच शकत नाही असं मतही त्याने मांडलं.
बायोपिक मसालापटांप्रमाणे कमाई करत नसले तरी त्याला हे आकडे बायोपिक बनवण्यापासून रोखत नसल्याचं अक्षय म्हणाला. “टॉयलेट एक प्रेम कथा, पॅडमॅनपूर्वी अशा विषयांवर चित्रपट बनवण्याचे धाडस कोणी केले नव्हते. जेव्हा मी टॉयलेट एक प्रेम कथा बनवली, तेव्हा सगळे मला म्हणाले, ‘तू वेडा आहेस का, हे चित्रपटाचे नाव असू शकते का? तुला टॉयलेटवर चित्रपट बनवायचा आहे, असं तू म्हणतोय?’ पण मी लोकांच्या बोलण्यामुळे थांबलो नाही, पुढे गेलो,” असं अक्षयने सांगितलं. ‘डीएनए’ने याबद्दल वृत्त दिलं आहे.
यावेळी अक्षयने त्याच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाचाही उल्लेख केला. “मी सॅनिटरी पॅडवर एक फिल्म बनवली, कोणाच्या बापाची हिंमत नाही की सॅनिटरी पॅडवर चित्रपट बनवेल,” असं अक्षय कुमारने म्हटलं. अभिनेत्याने मसालापट आणि बायोपिकच्या कमाईची तुलना करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. “असे सिनेमे मोठी कमाई करत नसतील तर ते बनवणं थांबवायचं का? कुणाला तरी हे चित्रपट बनवावे लागतीलच ना. व्यावसायिक चित्रपट व सत्यकथेवर आधारित चित्रपटांच्या कमाईत फरक असणारच,” असं अक्षयने स्पष्ट केलं.
“मिशन रानीगंज हा चित्रपट किती व्यवसाय करेल, याबद्दल विचारून माझा उत्साह कमी करू नका. समाज बदलण्याची ताकद असलेले आणखी चित्रपट बनवण्याची हिंमत मला द्या,” असं अक्षय म्हणाला. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये ‘पॅडमॅन’, ‘केसरी’, ‘मिशन मंगल’ आणि ‘मिशन राणीगंज’ हे बायोपिक केले आहेत.