अभिनेता अक्षय कुमार त्याच्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखला जातो. अलीकडच्या काळात त्याने अनेक देशभक्तीपर व खऱ्या कथांवर आधारित चित्रपट केले आहेत. काही वर्षांत विविध बायोपिकमध्ये काम केले आहे. त्याने ‘पॅड मॅन’ या चित्रपटात लक्ष्मीकांत चौहानची भूमिका केली होती. त्यानंतर त्याने ‘गोल्ड’, ‘केसरी’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘मिशन रानीगंज’, ‘सरफिरा’ आणि आता ‘स्काय फोर्स’ या बायोपिकमध्ये काम केलं आहे. त्याचा ‘स्काय फोर्स’ शुक्रवारी, २४ जानेवारी रोजी रिलीज झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्काय फोर्स’ हा सिनेमा सत्य कथेवर आधारित आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धात भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षयने विंग कमांडर केओ अजुहा (रिअल लाइफ हिरो ओ.पी. तनेजा यांच्याकडून प्रेरित) ही भूमिका केली आहे. तर वीर पहारियाने टी विजय हे पात्र साकारले आहे. त्याची भूमिका रिअल लाइफ हिरो अज्जमदा बोप्पय्या देवय्या यांच्यापासून प्रेरित आहे. अक्षय कुमारने अनेक बायोपिक केल्या, पण त्यातले बरेच चित्रपट फ्लॉप झाले, तरीही तो अशा भूमिका करत राहतो. आता अक्षयने हे चित्रपट का निवडले, ते सांगितलं आहे.

पुस्तकांमध्ये नसलेल्या भूमिका जाणीवपूर्वक करतो – अक्षय कुमार

न्यूज 18 शो शाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की तो असे चित्रपट निवडतो जे आदर्शपणे शाळेतील पाठ्यपुस्तकांचा भाग असायला हवे होते. “अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुस्तकात नाहीत. मी आपल्या पुस्तकांमध्ये नसलेल्या भूमिका जाणीवपूर्वक करतो. मला हेच करायचं आहे. ते सर्व असे हिरो आहेत, ज्याच्याबद्दल लोकांना काहीच माहिती नाही; कारण कोणीही खोलात जाऊन त्यांच्याबद्दल माहिती मिळवत नाही, त्यामुळे मी अशा प्रकारच्या भूमिका करतो,” असं अक्षय म्हणाला.

इतिहासाच्या पुस्तकांबद्दल अक्षय म्हणाला..

अक्षयने पुढे मुलांच्या इतिहासाच्या पुस्तकांबद्दल नाराजी व्यक्त केली. “पुस्तकांमध्ये बऱ्याच गोष्टी बदलण्याची गरज आहे. आपण पुस्तकांमध्ये अकबर किंवा औरंगजेबाबद्दल वाचतो पण आपल्या हिरोंबद्दल वाचत नाही. आपल्या हिरोंचा उल्लेख पुस्तकांमध्ये करणं आवश्यक आहे. लष्करातील अनेक वीरांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. मला वाटतं की इतिहासात दुरुस्त्या करणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारच्या आपल्या वीरांचा पुस्तकात समावेश करून आपल्या पिढीला सांगितलं पाहिजे,” असं मत अक्षय कुमारने व्यक्त केलं.

संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित ‘स्काय फोर्स’मध्ये अक्षय व वीरबरोबर सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar says history books needs to be corrected we read about akbar or aurangzeb not about our heroes hrc