अक्षय कुमार बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. गेल्यावर्षी अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले ज्यामुळे त्याला चांगलाच फटका बसला. आता पुन्हा अक्षय ‘सेल्फी’ या त्याच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अक्षयने सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे बरेच चित्रपट काढले आहेत शिवाय तो देशातील महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देतो आणि त्यासाठी तो कायम पुढाकार घेताना आपल्याला दिसतो, पण अक्षयलाच लहानपणी एकदा विनयभंगाचा सामना करावा लागला होता.
६ वर्षाचा असताना एका लिफ्टमॅनने अक्षयला चुकीच्या पद्धतीने हात लावला होता. मानवी तस्करी या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये अक्षय कुमारने सहभाग घेतला होता, तेव्हा या कार्यक्रमात त्याने त्याच्याबरोबर घडलेल्या या घटनेचा उल्लेख केला होता. या घटनेबद्दल नंतर अक्षयने त्याच्या आईवडिलांकडेदेखील तक्रार केली होती. अक्षयने सांगितलं की ६ वर्षाचा असताना लिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्याशी छेडछाड केली होती.
आणखी वाचा : “टाइमपास…” वीरेंद्र सेहवागची शाहरुख खानच्या ‘पठाण’बद्दल खास पोस्ट चर्चेत
अक्षय म्हणाला, “मी ६ वर्षांचा होतो तेव्हा मी आमच्या शेजारच्यांकडे जात असताना लिफ्टमधील माणसाने माझ्या पार्श्वभागाला हात लावला. तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं, मी ही गोष्ट लगेच माझ्या आई-वडिलांच्या कानावार घातली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत त्याची तक्रार केली अन् पोलीसांनी त्याला अटकही केली. त्या घटनेचा माझ्यावर चांगलाच परिणाम झाला. मी तसा लाजाळू होतो, पण मी माझ्या आई-वडिलांजवळ माझं मन मोकळं करू शकत होतो.”
महिला आणि मुलांनी याबद्दल उघडपणे बोललं पाहिजे असंही मत या कार्यक्रमात अक्षय कुमारने व्यक्त केलं होतं. अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटातून कायम एक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो. मध्यंतरी त्याने ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये लैंगिक शिक्षणावर चित्रपट काढणार असल्याचाही खुलासा केला होता.