अक्षय कुमार(Akshay Kumar)ने अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. जे चित्रपट सामाजित विषयांवर भाष्य करतात. ज्यामध्ये ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. अलीकडे त्याचे चित्रपट मोठ्या प्रमाणात चालले नसल्याचे दिसत आहे. तरीही अभिनेता विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नुकताच त्याचा स्काय फोर्स हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. लवकरच तो ‘केसरी २’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या निमित्ताने त्याने नुकतीच पत्रकार परिषद घेतली.

हे चित्रपट मी मनापासून…

अक्षय कुमारने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चित्रपटांवर टीका करण्याबाबत म्हणाला, “मला वाटत नाही की त्या चित्रपटांवर कोणी टीका केली आहे. जे मूर्ख आहेत तेच ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’, ‘एअरलिफ्ट’, ‘केसरी’ अशा चित्रपटांवर टीका करू शकतात. कोणीतरी मूर्ख या चित्रपटांवर टीका करेल. हे चित्रपट मी मनापासून बनवलेत. लोकांना त्यामधून काहीतरी चांगला संदेश मिळतो.

जेव्हा त्याला सांगितले गेले की काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी त्याच्या ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’च्या टायटलवर टीका केली होती. त्यावर अभिनेता म्हणाला की जर त्या काही बोलल्या असतील तर ते बरोबर असू शकतं. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ बनवताना मी काहीतरी चूक केलेली असावी. त्या जर काही म्हणत असतील तर ते बरोबरच असेल.

पुढे अभिनेत्याने असेही म्हटले की चित्रपटांतून बदल घडवण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ अशाच चित्रपटांपैकी एक होता. ज्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या घरात शौचालय असले पाहिजे, याची जाणीव व्हावी, अशा प्रकारचा संदेश दिला गेला. सरकारनेदेखील तो चित्रपट काही ठिकाणी, काही गावांमध्ये फ्रीमध्ये लोकांना दाखवला आहे. पॅडमॅन हा त्या चित्रपटांपैकी एक आहे.

दरम्यान, इंडिया टीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अक्षय कुमारच्या एका चित्रपटाच्या नावावर त्यांचे मत व्यक्त केले. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाबद्दल त्या म्हणाल्या, “या चित्रपटाचे नाव बघा. असे नाव असेल, तर मी कधीच चित्रपट पाहण्यास जाणार नाही. हे असे नाव असते का?”, असे म्हणत जया बच्चन यांनी चित्रपटाच्या अशा नावावर नाराजी दर्शवली. पुढे त्यांनी प्रेक्षकांना विचारले की, जर एखाद्या चित्रपटाचे असे नाव असेल, तर ते चित्रपट पाहण्यास जातील का, असा प्रश्न विचारला. त्यावर काही जणांनी हात वर केला. यावर जया बच्चन यांनी म्हटले, “इतक्या लोकांमध्ये फक्त चार लोक असे नाव असलेले चित्रपट पाहण्यास जाणार असतील, तर ती दु:खाची गोष्ट आहे. त्यामुळे असे चित्रपट फ्लॉप होत आहेत.”