Kesari 2 Box Office Collection Day 10: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार ‘केसरी : चाप्टर २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अक्षय कुमारबरोबरच या चित्रपटात आर माधवन व अनन्या पांडेदेखील प्रमुख भूमिकेत आहे.
१० व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
आता ‘केसरी: चाप्टर २’ने बॉक्स ऑफिसवर १० व्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊ. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या रविवारी केसरी २ ने ८.१५ कोटींची कमाई केली. गेल्या रविवारी चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर ही सर्वात जास्त कमाई आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण ४६.१ कोटींची कमाई केली. शुक्रवारी ४.०५ कोटी, शनिवारी ७.१५ कोटी; तर रविवारी ८.१५ कोटींची कमाई केली. अशाप्रकारे आतापर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत ६५.४५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचे तर लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल, असे म्हटले जात आहे.
यावर्षी प्रदर्शित झालेल्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये कमाईच्या बाबतीत केसरी २ पाचव्या क्रमांकावर आहे. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दहाव्या दिवशी ८.१५ कोटींची कमाई केली. ‘जाट’ चित्रपटाने १० व्या दिवशी ३.७५ कोटींची कमाई केली होती. ‘सिंकदर” चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर दहाव्या दिवशी १.५ कोटींची कमाई केली होती; तर ‘स्काय फोर्स’ने ५.५ कोटींची कमाई केली होती.
अक्षय कुमारच्या या ‘केसरी २’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सनी देओलच्या ‘जाट’, तसेच तमिळ चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’, ‘थंडरम’ या मल्याळम सिनेमांना मागे टाकले आहे. मात्र, आता १ मे रोजी अजय देवगण व रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रेड २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ‘केसरी २’च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. आता ‘केसरी: चाप्टर २’ आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अक्षय कुमार याआधी ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याआधी अक्षय कुमारचे काही सलग चित्रपट फ्लॉफ ठरले. ज्यामध्ये ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘सरफिरा’, ‘खेल खेल में’, ‘सिंघम अगेन’ हे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. आता ‘स्काय फोर्स’ आणि ‘केसरी २’ या चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.