२०२२ हे वर्षं बॉलिवूडसाठी तितकं लाभदायक नव्हतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. एकापाठोपाठ एक बॉलिवूडचे बहुतेक चित्रपट दणकून आपटले. सणांच्या दिवशी बॉलिवूडचे चित्रपट तूफान चालतात. दिवाळी, ईद, न्यू इअर या दिवशी बरेचसे चित्रपट सुपरहीट ठरतात हा बॉलिवूडचा फार जुना मापदंड आहे. यावर्षीसुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर २ सुपरस्टार आमने सामने येणार आहेत.

२५ ऑक्टोबरला अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ आणि अजय देवगणचा ‘थॅंक गॉड’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपट थोडेफार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते, पण अखेर काही बदल करून हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांसाठी प्रेक्षक तसे उत्सुक आहेत, पण एकूणच बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा थंड प्रतिसाद बघता या चित्रपटांकडून कुणीच जास्त अपेक्षा ठेवलेली नाही. दोन्ही चित्रपटांचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि यामध्ये कोणत्या अभिनेत्याने बाजी मारून नेली आहे त्याचा आपण आढावा घेऊयात.

आणखी वाचा : ओटीटीवरील अ‍ॅडल्ट चित्रपटात काम करण्यास जबरदस्ती; २६ वर्षीय तरुणाचा गंभीर आरोप

‘राम सेतु’चं बुकिंग लिमिटेड ठिकाणी सुरू केलं असलं तरी या चित्रपटाची जवळजवळ ९६२२ तिकीटं विकली गेली आहेत, म्हणजेच प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने २७.०८ लाखापेक्षा अधिक कमाई केली आहे. अजय देवगणच्या ‘थॅंक गॉड’चित्रपटाची तब्बल ६०६५ तिकीटं विकली गेली आहेत, त्यामुळे अजयच्या या चित्रपटाने १७.२५ लाख एवढी कमाई केली आहे. हे आकडे बघता प्रेक्षकांनी पहिली पसंती अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ला दिली आहे हे स्पष्ट होत आहे.

अक्षयचा ‘राम सेतु’ पहिल्या दिवशी १० ते १५ कोटी तर अजयचा ‘थॅंक गॉड’ ७.५ ते १० कोटी इतकी कमाई करेल असं काही सिनेतज्ञ आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे. ‘राम सेतु’ मध्ये अक्षय कुमारबरोबर जॅकलीन फर्नांडिज, नुशरत भरूचा या मुख्य भूमिकेत आहेत, तर ‘थॅंक गॉड’मध्ये अजय देवगणबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंग हे दोघे मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहेत.

Story img Loader