कलाकार व क्रू मेंबर्सना थकबाकी न दिल्याचे आरोप वाशू भगनानी यांच्या निर्मिती आणि वितरण कंपनी पूजा एंटरटेनमेंटवर होत आहे. अखेर या प्रकरणावर पूजा एंटरटेनमेंटकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बॉलीवूड स्टार अक्षय कुमार पुढे सरसावला आहे, अशी माहिती मिळत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून आमदार धिरज देशमुख व अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचे सासरे वाशू भगनानी यांची निर्मिती व वितरण कंपनी पूजा एंटरटेनमेंटद्वारे चित्रपटांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत अशा बातम्या येत आहेत. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी कंपनीचे संस्थापक वाशू भगनानी यांनी थकबाकी दिलेली नाही असे आरोप काही क्रू मेंबर्सनी केले होते. एका क्रू मेंबरने इन्स्टाग्रामवर सर्वात आधी पोस्ट केली होती, त्यानंतर अनेकांनी समोर येत त्यांनाही पैसे मिळाले नसल्याचं म्हटलं होतं.
वाशू भगनानी यांचा मुलगा, अभिनेता व सह-निर्माता जॅकी भगनानी याने पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली सुपरफ्लॉप ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाची निर्मिती केली होती. यात टायगर श्रॉफ व अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. आता थकबाकीसंदर्भात होणाऱ्या सर्व आरोपांवर जॅकी भगनानीने उत्तर दिलं आहे.
“अक्षय सर नुकतेच मला भेटले आणि या विषयावर चर्चा केली. या परिस्थितीबद्दल त्यांनी जाणून घेतलं आणि सरांनी या परिस्थितीत पुढे येऊन क्रूसाठी आपला पाठिंबा दर्शवण्यास संकोच केला नाही. आमच्या चित्रपटांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचं पूर्ण पेमेंट मिळत नाही, तोवर ते पैसे घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. अक्षय सरांनी आम्हाला समजून घेतलं आणि या काळात आमच्याबरोबर ते उभे राहिलेत यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. चित्रपट व्यवसाय अशाच घट्ट नातेसंबंधांवर टिकून आहे,” असं जॅकीने एका निवेदनात म्हटलं आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, क्रू मेंबर्स व्यतिरिक्त ‘बडे मियाँ छोटे मियाँ’तील कलाकार टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि मानुषी छिल्लर यांनाही एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी मानधन मिळालं नाही. “टायगर श्रॉफलाही चित्रपटासाठी त्याचं मानधन मिळालेलं नाही. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’शी संबंधित लोकांची थकबाकी न देण्याबाबत त्यांनी मौन बाळगलं आहे, चित्रपटासाठी राबणाऱ्या क्रू आणि सपोर्ट स्टाफलाही पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर पैसे द्यावे” असं एका सूत्राने म्हटलं होतं. पूजा एंटरटेनमेंटवर क्रू आणि इतर कर्मचाऱ्यांची जवळपास अडीच कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं म्हटलं जात आहे.