Mahashivratri 2024: महाशिवरात्रीच्या निमित्ताने सगळीकडे आध्यात्मिक वातावरण पाहायला मिळतंय. अशातच बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारनं त्याच्या आणि भगवान शिव यांच्यातील खास नात्याबद्दल खुलासा केला. अक्षयने त्याच्या चित्रपटांतील विविध भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘ओएमजी २’मधलं अक्षयचं ‘शिवदूत’ पात्र लोकप्रिय ठरलं. अलीकडेच त्याचं ‘शंभू’ हे गाणंसुद्धा प्रदर्शित झालं आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्याच्या आणि भगवान शिव यांच्याबद्दल सांगताना अक्षय भावूक झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एचटी सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “जेव्हा मी माझ्या आईला गमावलं तेव्हा माझं भगवान शिवाशी घट्ट नातं तयार झालं. भगवान शिवा माझ्या मनाला शांती देतात. प्रत्येक दु:खामागे एक नवीन आयुष्य दडलेलं असतं. भगवान शिवा यीन आणि यांगचं जिवंत स्वरूप आहेत. आयुष्यात अंधार आल्याशिवाय उजेड येत नाही. ओएमजी-२ हा चित्रपट माझ्या आयुष्यात जेव्हा आला तेव्हा मलाच माहीत नव्हतं की मला याची गरज आहे आणि हे काम भगवान शिवाचं आहे. आता मी रोज उठल्यावर व्यायाम करताना भगवान शिवाची गाणी ऐकतो आणि तेव्हाही मला त्याची ताकद जाणवते. मला माझ्या आयुष्यात पुढील वाटचालीवर विश्वास आहे. कारण- या सगळ्याचा कर्ता-करविता भगवान शिवाच आहेत.”

हेही वाचा… ‘नवरोबा नवरोबा’ म्हणत सनी लिओनीने केला मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स; अजिंक्य राऊत म्हणाला, “माझं गाणं इतकं…”

अक्षय गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उजैनच्या महाकालेश्वर मंदिरात गेला होता. तिथे त्यानं भस्म आरतीचा अनुभव घेतला. अक्षय म्हणाला, “हा लक्षात राहण्यासारखा एक दैवी अनुभव होता.” ‘ओएमजी २’मधला अनुभव सांगत अक्षय म्हणाला, ” ‘ओएमजी २’च्या शूटिंगसाठी मी महादेव की नगरी उजैनला गेलो होतो. तिथे प्रत्येक जण ‘जय महाकाल’, ‘हर हर महादेव’, असं म्हणत एकमेकांना शुभेच्छा द्यायचा आणि त्याच क्षणी त्या शुभेच्छांना प्रत्युत्तरही मिळायचं. शेवटी महादेवच सगळं काही आहे. हे त्यावेळी मला जाणवलं होतं.”

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत महादेवाचा फोटो शेअर केला आहे. “देवांचा देव, हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाकाल.” अशी कॅप्शन या फोटोला अक्षयने दिली आहे.

दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यात अक्षय कुमारबरोबर टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया फर्निचरवाला, रोनित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ईदच्या मुहूर्तावर १२ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar wished mahashivratri opened up about his relation between god shiva mahakal after his mothers death and omg 2 movie dvr