बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार नुकताच ‘स्काय फोर्स'(Sky Force) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०२४ मध्ये २५ जानेवारीदरम्यान हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला फायटर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही चित्रपट हवाई दलावर आधारित आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची साहजिकच तुलना सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता अक्षय ओबेरॉयने यावर वक्तव्य केले आहे. फायटर या चित्रपटात हृतिक रोशनबरोबर तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
नफा व तोटा या महत्त्वाच्या गोष्टी असणारा समाज…
अक्षय ओबेरॉयने स्काय फोर्स व फायटर या दोन्ही चित्रपटांच्या होणाऱ्या तुलनेवर म्हटले, “दोन्ही चित्रपट एअर फोर्सवर आधारित असल्याने त्यांची तुलना होणे साहजिक आहे. त्याचा मला काही त्रास होत नाही. स्पेसवर आधारित काही ६-७ कहाण्या असतील, ज्या तुम्ही सांगू शकता. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट कशी सांगता, यावर सर्व काही अवलंबून आहे. मला विश्वास आहे की, पटकथा वेगळी असेल.”
चित्रपट कसा आहे याबरोबरच बॉक्स ऑफिसवर कमाईचा किती आकडा गाठला, यावरूनही बऱ्याचदा सिनेमांची तुलना होताना दिसते. यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “समस्या ही आहे की, नफा व तोटा या महत्त्वाच्या गोष्टी असणारा समाज आपण निर्माण केला आहे. या पृथ्वीवरील तुम्ही सर्वांत वाईट कलाकार असाल. पण तरीही कोणत्याही कारणानं तुमचा चित्रपट चालला, तुमच्या चित्रपटानं खूप पैसे कमावले, तर इंडस्ट्रीमधील सगळ्यात मोठे दिग्दर्शक तुम्हाला कास्ट करतील. आपण अशा जगात राहतो, जिथे प्रतिभेपेक्षा पैशाला पुजले जाते. पैशाला जास्त महत्त्व दिले जाते. अशा ठिकाणी तुलनेसारख्या गोष्टी होणार नाहीत, अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो?”
पुढे त्याने याबद्दल अधिक बोलताना म्हटले, “तुम्हाला एक कलाकार दुसऱ्याबद्दल अशा गोष्टी म्हणताना दिसेल की काही वर्षांत अमुक अमुक कलाकारांनी इतरांपेक्षा जास्त पैसे कमावले. हे असे घडते. कारण- पैसे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आपण हे असे तयार केले आहे. पैसे सगळ्यात वरच्या क्रमांकावर असायला हवेत, असा नियम आपण बनवला आहे. त्यामुळे ते मिळवण्यासाठी लोक काहीही करतात आणि मग स्वत:ला वर ढकलण्यासाठी कोणाचे पाय खाली खेचण्याची वेळ आली, तर लोक तेदेखील करण्यासाठी तयार असतात आणि हे घडत राहते. आदर्श जगात हे सर्व घडत नाही; पण अशा गोष्टींवर रडत बसण्यात काहीही अर्थ नाही. हा एक खेळ आहे आणि असाच खेळला जातो.