गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. वेगवेगळ्या चित्रपटांचं या महोत्सवात स्क्रीनिंग झालं. मातब्बर कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच इतरही देशातील प्रतिष्ठित कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. वेगवेगळ्या कलाकारांनी या मंचावर त्यांचं मनोगत आणि चित्रपटसृष्टीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही या सोहळ्याच्या सांगता समारंभाला हजेरी लावली. चित्रपटसृष्टीतील त्याचं योगदान आणि भारतीय चित्रपटांचं प्रदर्शन याविषयीसुद्धा त्याने मत मांडलं. सध्या ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्याने अक्षय चांगलाच चर्चेत आहे. शिवाय या सोहळ्यात ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या सादरीकरणावरुनही बराच वाद निर्माण झाला आहे.
यावर टिप्पणी न करता अक्षयने एकूणच भारतीय चित्रपटांचं कौतुक केलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार अक्षय कुमार म्हणाला, “भारताची वाटचाल ही महासत्ता होण्याकडे सुरू आहे. जास्तीत जास्त चित्रपट हे भारतात बनत आहेत शिवाय भारतीय चित्रपट इतरही भाषांमध्ये सादर करण्याचं प्रमाण वाढलं आहे.”
अक्षय कुमारबरोबरच आयुष्मान खुराना, आशा पारेख, मानुषी चिल्लर, इशा गुप्ता, आनंद रायसारख्या बॉलिवूड कलाकारांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. शेवटच्या दिवशी तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. एकूणच यावर्षीचा या महोत्सवही थाटात पार पडला आणि कलाकारांनी हजेरी लावून याची शोभा द्विगुणित केली.