ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर सध्या त्यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ते पाकिस्तानमधील लाहोर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे भर कार्यक्रमात त्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानला सुनावलं. यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता याच संपूर्ण प्रकरणावर एकेकाळी बॉलिवूडमध्ये काम करणारा पाकिस्तानी अभिनेता व गायक अली जफरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अली जफरने जावेद अख्तर यांना एक गाणं समर्पित केलं होतं. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं त्याने गायलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी लोक अलीवर संतापले होते.
लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्यानंतर अली जफरने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला, “मित्रांनो, मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो आणि तुमचं कौतुक व टीकेला समान महत्त्व देतो. परंतु मी नेहमीच एका गोष्टीची विनंती करतो, कोणतेही निष्कर्ष किंवा निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी तथ्ये तपासा. मी फैज फेस्टिव्हलमध्ये हजर नव्हतो तसेच जावेद अख्तर तिथे काय बोलले होते ते मला माहीत नव्हतं. मी हे दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर पाहिलं होतं.”
अलीने पुढे लिहिलं, “एक प्राउड पाकिस्तानी असल्याचा मला अभिमान आहे आणि कोणताही पाकिस्तानी आपला देश किंवा लोकांविरूद्ध कोणत्याही विधानाचे कौतुक करणार नाही. तेही लोकांना जवळ आणण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तर मुळीच नाही. दहशतवादामुळे पाकिस्तानने काय सहन केलंय आणि अजूनही काय भोगावं लागतंय, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अशा प्रकारची असंवेदनशील आणि अनावश्यक टिप्पणी केल्यामुळे बर्याच लोकांच्या भावना दुखाऊ शकतात.”
“आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशापद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ही लोक अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको,” असं जावेद अख्तर त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.