आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आलियाने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्गही आहे. तर अनेक कलाकार आलिया भट्टचं तिच्या कामासाठी कौतुक करतानाही दिसतात. परंतु असं असलं तरी आलिया तिच्या भावासाठी मात्र तितकी प्रतिभावान अभिनेत्री नसल्याचं त्यानं स्वत: म्हटलं आहे. आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्ट यानं नुकतंच आलियाबद्दल वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतं.

राहुल भट्टनं आलियाबद्दलचं त्याचं मत नुकतच एका मुलाखतीत सांगितलं आहे. राहुलनं नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याची सावत्र बहीण आलिया भट्ट व त्याचं नातं कसं आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना राहुलने सांगितलं, ”आमच्यात चांगले संबंध आहेत. अर्थात, एक फोन करून मी तुला भेटायला येतोय, असं म्हणू शकत नाही किंवा तितकी जवळीक आमच्यात नाही. पण, आलिया एक चांगली अभिनेत्री आहे. ती माझी दुसरी सावत्र बहीण शाहीन भट्टची काळजी घेत असते, जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे”.

पुढे राहुलला “आलियानं आजवर अनेक वैविध्यपुर्ण भूमिका साकारल्या असून, तिनं खऱ्या अर्थानं महेश भट्ट यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेला आहे, असं वाटतं” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत राहुल म्हणाला, “आलिया माझी सख्खी बहीण पूजा भट्टइतकी प्रतिभावान अभिनेत्री नाही. ती पूजासमोर चाय कम पाणी आहे”.आलियानं नाही, तर पूजानं खऱ्या अर्थानं माझ्या बाबांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेला आहे. ती ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सौंदर्य, कला,अभिनय या सर्व गोष्टींमध्ये पूजा आलियापेक्षा खूप पुढे आहे.

“आलिया पूजाची बरोबरी कधीच करू शकत नाही; पण ती आताची एक यशस्वी अभिनेत्री आहे. एक चांगली आई आहे. तिला पी.आर.बद्दल माहिती आहे. तिला एक चांगला जोडीदार मिळाला आहे. त्यामुळे ती आज इतकी यशस्वी अभिनेत्री आहे; परंतु पूजाची तुलना आलियाबरोबर होऊ शकत नाही”.

तसेच, राहुल यानं अभिनेता रणबीर कपूरबद्दलही वक्तव्य केलं आहे. राहुल रणबीरबद्दल बोलताना म्हणाला, “मी त्याला लहानपणापासून बघत आलो आहे. तो एक चांगला माणूस आहे. काम करताना तो फार गंभीर असतो आणि त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते. तो अभिनेता म्हणून कसा आहे किंवा त्यानं काय कमावलं आहे यापेक्षा तो एक वडील म्हणून खूप चांगला आहे. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्याच्या मुलीवर त्याचं खूप जास्त प्रेम आहे आणि त्याच्याबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडते.”

दरम्यान, राहुल भट्ट हा आलिया भट्टचा सावत्र भाऊ असून, अभिनेत्री पूजा भट्टचा सख्खा भाऊ आहे. तर पूजा व राहुल हे दोघे महेश भट्ट व त्यांची पहिली पत्नी किरण यांची मुलं आहेत आणि आलिया भट्ट व तिची बहीण शाहीन भट्ट या दोघी महेश भट्ट व त्यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांच्या मुली आहेत.