Alia Bhatt And Raha Kapoor : राहा कपूर सध्या सोशल मीडियाची फेव्हरेट स्टारकिड झालेली आहे. नाताळचा सण आणि राहा यांचं एक वेगळं कनेक्शन निर्माण झालेलं आहे. दरवर्षी कपूर कुटुंबीय एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतात. यावर्षी सुद्धा या कुटुंबीयांनी एकत्र सेलिब्रेशन केलं. पण, या सगळ्यात चर्चेत होती ती म्हणजे रणबीर आलियाची लाडकी लेक राहा कपूर. ही चिमुकली अवघ्या दोन वर्षांची आहे पण, तिचा गोंडस अंदाज, क्यूट हावभावांमुळे सगळेजण राहा कॅमेऱ्यासमोर केव्हा येणार याची आतुरतेने वाट पाहत असतात.
२०२३ मध्ये राहा पहिल्यांदा माध्यमांसमोर आली होती. तेव्हा ती अगदीच एक वर्षांची असल्याने बाबा रणबीरला बिलगून होती. पण, यावर्षी ( २०२४ ) राहाने सगळ्या पापाराझींना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. आलिया सुरुवातीला पापाराझींसमोर आली आणि तिने, “राहा बाहेर येतेय…प्लीज आवाज करु नकात शांत बसा” असं हातवारे करून सर्वांना सांगितलं होतं. यानंतर बाबाच्या कडेवरून राहा गाडीच्या बाहेर आली आणि तिने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

राहाने जाता-जाता कॅमेऱ्याकडे पाहून सर्वांना हाय केलं. इतकंच नव्हे तर फ्लायिंग किस सुद्धा दिल्या. पण, शेवटी या चिमुकलीने आपल्या आईसारखी हुबेहूब एक कृती केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलिया ज्याप्रकारे हातवारे करून शांत बसा, मोठ्याने बोलू नका असं पापाराझींना सांगत होती, अगदी त्याचप्रकारे राहाने सुद्धा सर्वांना तोंडावर हात ठेवून शांत बसा असा इशारा केला. या मायलेकींच्या सेम टू सेम कृतीचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
ख्रिसमसनंतर आता कपूर कुटुंबीय नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सुट्ट्यांवर गेले आहेत. यावेळी राहा एअरपोर्टवर आपल्या आई-बाबांसह पुन्हा एकदा पापाराझींना अभिवादन करताना दिसली. तिने सर्वांना फ्लायिंग किस दिल्या. हा गुण सुद्धा रणबीर आणि आलियाकडून राहाने अगदी सेम टू सेम घेतलाय अशा आशयाचे व्हिडीओ सुद्धा चाहत्यांकडून बनवण्यात आले आहेत.
दरम्यान, राहा कपूरबद्दल सांगायचं झालं, तिचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जिओ सेंटरला राहाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला होता.