अभिनेत्री आलिया भट्टने ६ नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. या बाळाच्या आगमनाने कपूर व भट्ट परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सर्वत्र रणबीर आणि आलियाच्या लेकीची चर्चा पाहायला मिळत आहे. बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी आलिया रुग्णालयातून घरी परतली. पुढचे तीन-चार आठवडे ती घरी राहून आराम करणार आहे असे म्हटले जात आहे. या काळामध्ये रणबीर त्याच्या कामावर लक्ष देत आहे.
आलियासाठी २०२२ वर्ष खूप लकी ठरत आहे. लग्नापासून ते लेकीच्या जन्मापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये सर्वकाही छान घडतं आहे. या वर्षामध्ये तिचे ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ असे सुपरहिट प्रदर्शित झाले. त्याशिवाय तिने याच काळामध्ये हॉलिवूडच्या एका चित्रपटामध्येही काम केले. ‘ब्रह्मास्त्र’नंतर आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे.
आलिया सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. लेकीच्या जन्माची बातमीसुद्धा तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन दिली होती. नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये “७ वर्षांनंतर चित्रपटगृहांमध्ये परतायची वेळ आली आहे. माझ्या सातव्या चित्रपटाच्या सेटवर मला एकापेक्षा एक दर्जेदार कलाकारांबरोबर काम करायची संधी मला मिळाली. ही आपल्या परंपरांशी जोडलेली कहाणी आहे आणि या कहाणीचे संगीत फार मनमोहक आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह पॉपकॉर्न खात मोठ्या पडद्यावरची जादू पुन्हा अनुभवण्याची वेळ आली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे ही घोषणा करताना मला फार आनंद होत आहे. – करण जोहर.”
यावरुन तिने हा फोटो करण जोहरच्या फिडवरुन रिपोस्ट केला असल्याचे लक्षात येते. या चित्रपटामध्ये तिच्यासह रणवीर सिंग प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यांच्याव्यतिरिक्त धर्मंद्र, जया बच्चन, शबाना आझमी हे कलाकार सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. करण जोहर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये कमबॅक करणार आहे.