सध्याच्या काही आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत आवर्जून येणारे नाव म्हणजे आलिया भट्ट (Alia Bhatt). आलियाने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘हायवे’ (Highway). ‘हायवे’ हा चित्रपट आलिया भट्टच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात वीरा त्रिपाठीच्या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटामुळेच ती केवळ उत्तम अभिनेत्री आहे हे सिद्ध झाले. पण, ‘हायवे’ हा चित्रपट करण्यास आलिया सुरुवातीला घाबरली होती? मग नंतर एका व्यक्तीमुळे तिनं यात काम करण्यास होकार दिला.

चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांनी याबद्दल नुकतंच वक्तव्य केलं. ‘गेम चेंजर्स’साठी कोमल नाहटा यांच्याशी झालेल्या संभाषणात इम्तियाज अली यांनी सांगितलं की, ‘हायवे’साठी ते आधी अनुभवी अभिनेत्रीची निवड करण्याचा विचार करीत होते. या भूमिकेसाठी त्यांना तिशीच्या आसपास वय असलेल्या अभिनेत्रीची आवश्यकता आहे. पण १८ वर्षांच्या आलिया भट्टला भेटल्यानंतर त्यांना ती या भूमिकेसाठी परिपूर्ण असल्याचं जाणवलं.

इम्तियाज अली यांनी सांगितले, “आलिया तेव्हा १८ वर्षांची असली तरीही तिच्यात पात्राला आवश्यक असलेली भावनिक खोली होती. तिनं तेव्हा जास्त काम केलं नव्हतं आणि मी तिचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटही पाहिला नव्हता; पण ती ज्या पद्धतीनं बोलली, ते खूप आकर्षक होतं. तिच्यात एक गुण होता, जो या चित्रपटासाठी उत्कृष्ट होता. तिच्या याच गुणानं मला खात्री पटवून दिली की, ती या भूमिकेसाठी योग्य आहे.”

इम्तियाज अली यांनी पुढे सांगितलं की, “महेश भट्ट यांनी ‘हायवे’ चित्रपटात काम करण्यास आलियाला तयार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. मी तिच्या घरी जायचो आणि भट्टसाहेब तिला हे काम करण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. सुरुवातीला ती थोडी घाबरली होती, तिला शंका होती की, ती हे काम करू शकेल की नाही. कारण- हा चित्रपट सोपा नव्हता. पण नंतर तिनं होकार दिलाच.”

दरम्यान, आलिया भट्टच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचा आगामी चित्रपट ‘अल्फा’ आहे. या चित्रपटात तिच्याबरोवर शर्वरी वाघदेखील असणार आहे. त्याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये देखील दिसणार आहे. त्यात तिच्याबरोबर रणबीर कपूर विकी कौशल हे कलाकारही असतील. हा बहुप्रतीक्षित चित्रपट २० मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader