अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट्ट यांनी या आठवड्यात करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघींनी व्यावसायिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्यासह अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि करणने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी करीनाला दीपिकाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण तिने तो प्रश्न आलियासाठी असल्याचं म्हटलं, त्यानंतर आलियाने दीपिकाबद्दलच्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
रॅपिड फायर सेगमेंट दरम्यान जेव्हा करणने करीनाला तू दीपिकाला तुझी प्रतिस्पर्धी मानतेस का? असं विचारलं तेव्हा ती चकित झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच हा प्रश्न तिच्यासाठी आहे का ते तिने तपासलं. “मी? नाही. मला वाटतं की हा प्रश्न आलियाच्या रॅपिड फायरसाठी आहे, माझ्यासाठी नाही,” मग ती म्हणाली, “मला हा प्रश्न का विचारला जात आहे?” हे ऐकून करण आणि आलियाला आपले हसू आवरता आले नाही.
या प्रश्नासाठी करीनाने आलियाकडे बोट दाखवले. त्यावर आलिया म्हणाली, “अजिबात नाही. तिची व माझी स्पर्धा का असेल? ती (दीपिका) माझी सिनिअर आहे. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. ” दरम्यान, आलियाच्या रॅपिड फायर सेगमेंटमध्ये तिने दीपिकाच्या ऑन-स्क्रीन लूकचे कौतुक केले आणि म्हणाली, “डीपी (दीपिका)जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहिल्याशिवाय राहूच शकत नाही.”
यावेळी करीनाने आलिया भट्टचं कौतुक केलं आणि मागच्या दशकातील ती सर्वोत्तम अभिनेत्री असल्याचं मत मांडलं. करीना व आलिया आता नातेवाईक आहेत. रणबीर कपूर हा करीनाचा चुलत भाऊ आहे. आलिया व रणबीरच्या लग्नात करीना कपूर खान कुटुंबाबरोबर पोहोचली होती. याशिवाय कपूर कुटुंबाच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये आलिया व करीना एकत्र पाहायला मिळतात. या दोघींची मैत्रीही खूप घट्ट आहे.