बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांचे निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. नरेंद्र राजदान यांना काही दिवसांपूर्वी फुफ्फुसात संसर्ग झाल्याच्या कारणामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान गुरुवारी(१ जून) त्यांची प्राणज्योत मालवली.

आजोबांच्या निधनानंतर आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. आलियाने आजोबांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. “माझे आजोबा, माझे हिरो” असं कॅप्शन आलियाने या व्हिडीओला दिलं आहे.

“९३व्या वर्षांपर्यंत गोल्फ खेळले, ९३व्या वर्षापर्यंत काम केलं, माझ्यासाठी उत्तम ऑम्लेट बनवलं, छान गोष्टी सांगितल्या, नातीबरोबर खेळण्याचा आनंद घेतला… क्रिकेटवर, कुटुंबावर व स्केचिंगवर प्रेम केलं…आणि शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याचा आनंद घेतला. माझं हृदय दु:खाने पण त्याबरोबरच आनंदानेही भरलं आहे…त्याचं कारण माझ्या आजोबांनी नेहमी आम्हाला आनंद दिला. मी स्वत:ला भाग्यवान समजते,” असं आलियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आजोबांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजताच आलियाने परदेश दौरा रद्द केला होता. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच आलिया विमानतळावरुन थेट ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाली होती.

Story img Loader