बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव रंजन करत आहेत. तर श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पण रणबीरची पत्नी आलिया भट्टने या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आलियाने रणबीरच्या आगामी चित्रपटावर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.
रणबीर कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाबाबत नवी माहिती आता समोर येत आहे. सुरुवातीला मेकर्सनी चित्रपटाच्या नावाची काही अक्षरंच चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर अनेकांना या चित्रपटाच्या नावाबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती. यावर अभिनेत्री आलिया भट्टनेही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
आणखी वाचा- महेश भट्ट लाडक्या नातीला देणार ‘ही’ खास भेट, खुलासा करत म्हणाले, “मी या जगात नसल्यावरही राहा…”
रणबीरच्या नव्या चित्रपटाच्या नावाबद्दल आलियाने अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर आता तिने इन्स्टाग्रामवर आपल्या मनातील गोष्ट शेअर केली आहे. जेव्हा ‘तू झूठी मैं मक्कार’चा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली होती. तिने या चित्रपटाची खिल्ली उडवताना लिहिलं, “माझा अंदाज खूपच जवळपास होता. फक्त सांगतेय.” आलिया भट्टने त्याआधी या चित्रपटाचं नाव ‘टिंगल जिंगल मिंगल मिंगल’ असं सांगितलं होतं.
दरम्यान लव रंजन यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट ८ मार्च २०२३ ला प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे आलिया भट्टबद्दल बोलायचं तर ती सध्या मॅटर्निटी ब्रेकवर आहे. एप्रिल २०२२ मध्ये आलिया- रणबीर यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये आलियाने मुलगी ‘राहा’ला जन्म दिला.