अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘जिगरा’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एक वर्षानंतर आलियाचा सिनेमा येत असून, ती नुकतीच या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आली होती. या कार्यक्रमाचा दुसरा सीझन आला आहे आणि पहिल्याच एपिसोडमध्ये कपिलने ‘जिगरा’च्या टीमचे स्वागत केले. आलियासह करण जोहर, वेदांग रैना व चित्रपटाचे दिग्दर्शक वासन बाला हे या कार्यक्रमात उपस्थित होते. या भागात मातृत्व, सेलिब्रिटींनी पालक झाल्यानंतर त्यांच्यात होणारे बदल यांवर चर्चा झाली. आलिया भट्टने रणबीर, राहा आणि त्यांच्या नात्यावर, तसेच ते करीत असलेल्या मजेशीर खेळांवर भाष्य केले.
आलिया सांगते, “रणबीर राहासाठी अनेक वेगवेगळे खेळ शोधून काढतो. अचानक तो राहाला विचारतो, ‘तुला कपाटातले कपडे हाताळायचे आहेत का?’ आणि मग ते दोघं एकत्र खेळतात. कपड्यांचं वर्गीकरण करताना ते ‘वेल्वेट’, ‘सुएड’, ‘कॉटन’ अशी मजेशीर नावं देतात. रणबीर खूप क्रिएटिव्ह आहे. हे पाहून मन खूप प्रसन्न होतं.”
रणबीर राहासाठी गातो मल्याळम अंगाई
आलियाने सांगितले, ”राहाची देखभाल करणाऱ्या नर्स केरळमधील आहेत आणि त्या राहाला झोपवताना एक मल्याळम गाणे अंगाई म्हणून गातात. हे गाणं १९९१ पासून मल्याळी कुटुंबांमध्ये मुलांना झोपवण्यासाठी लोकप्रिय आहे. हे गाणं १९९१ च्या मल्याळम चित्रपट ‘संध्वानम’मधील आहे.“ आलियाने पुढे सांगितले, “राहाला झोपायचं असेल तेव्हा ती ‘वावावो’ असं म्हणते आणि आता रणबीरदेखील ‘उन्नी वावावो’ गाणं शिकला आहे.” करण जोहरनेदेखील सांगितले की, त्याची मुलंही केरळच्या नर्समुळे मल्याळम भाषा शिकली आहेत.
राहाचे जीपा महेश भट्ट आणि आजी सोनी राजदान
कपिल शर्माने महेश भट्ट हे राहाचे आजोबा या भूमिकेत असताना कसे असतात, असा प्रश्न विचारला. त्यावर आलिया म्हणाली, “राहा त्यांना ‘जीपाऽऽ’ म्हणते आणि महेशजी त्यांच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे हावभाव करून राहाला हसवतात.” आलियाने पुढे सांगितले, “हे पाहून खूप गोड वाटतं आणि असं वाटतं की, माझ्या बाबांनी मला लहानपणी असंच हसवलं असेल. जेव्हा आपण आपल्या पालकांना आपल्या मुलांशी खेळताना पाहतो, तेव्हा आपलं स्वतःचं बालपण डोळ्यांसमोर उभं राहतं.”
त्यानंतर आलियाने तिची आई सोनी राजदान राहासाठी गाणी गात असल्याची एक गोड आठवण सांगितली. “माझी आई राहाचे डायपर बदलत असताना एक गाणं गाते. त्यात ती म्हणते, ‘पंजाबी समोसा, आलू का पकोडा, गुजराती का ढोकला…’ आणि हेच गाणं ती माझ्या बालपणी गात असे. त्यामुळेच मला लहानपणापासून ढोकळा, समोसा आवडतो,” असं आलिया हसत हसत सांगते.
हेही वाचा…जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
‘जिगरा’ सिनेमातील आलियाची भूमिका
आलिया भट्टने तिच्या आगामी ‘जिगरा’ सिनेमात एका बहिणीची भूमिका साकारली आहे; जी आपल्या भावाला परदेशात कैदेतून सोडवण्यासाठी जाते. या अॅक्शन ड्रामा सिनेमाची निर्मिती आलियाने करण जोहरसह केली असून, हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.