काहीच दिवसांपूर्वी ६०० कोटींचं बजेट असलेला बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. रामायणावर बेतलेल्या या चित्रपटाची वेगळ्याच कारणांमुळे चर्चा झाली. वादग्रस्त संवाद, रामायणाचं विचित्र चित्रण, वाईट व्हीएफएक्स अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांनी चित्रपटाचा प्रचंड विरोध केला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावरही बरीच टीका झाली.
याचदरम्यान रामायणावर बेतलेला आणखी एक चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरू झाली. ‘दंगल’सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक नितेश तिवारी हे रणबीर कपूर, अलिया भट्टबरोबर रामायण सादर करणार असल्याची बातमी समोर आली होती. यावरूनही बरीच टीका झाली, ‘केजीएफ’फेम यश यात रावणाची भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा सुरू होती. आता मात्र या प्रोजेक्टमधून आलिया भट्टने काढता पाय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे.
आणखी वाचा : “मी स्वतःला जोड्याने मारून घेईन…” राखी सावंतचा पहिला पती रितेशचं आदिल खानला पत्रकार परिषदेत चोख उत्तर
चित्रपटाशी जोडलेल्या एका खास व्यक्तीने ‘पिंकव्हीला’ला दिलेल्या माहितीनुसार, “या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत सांगायचं झालं तर रणबीर कपूर यासाठी अजूनही उत्सुक आहे, पण आलिया भट्ट आता या प्रोजेक्टपासून वेगळी झाली आहे. तिला सीतेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती, पण चित्रीकरणासाठी तारखा जुळत नसल्याने आलियाने यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे.”
यामुळेच या चित्रपटाचे चित्रीकरणही लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यंतरी नितेश तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य केलं होतं. ‘झूम एंटरटेनमेंट’शी संवाद साधताना नितेश म्हणाले, “मी जेव्हा एखादी कलाकृती बनवतो तेव्हा मी त्याचा पूर्णपणे अभ्यास करतो. ती कलाकृती करताना मी स्वतःच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतो त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की मी लोकांच्या भावनांचाही सन्मान करेन.”