Alia Bhatt Reaction On Chhaava : विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. याद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘छावा’चे शोज हाऊसफुल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये देखील ‘छावा’ सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सिनेमाने अवघ्या सहा दिवसांत २०३.६८ कोटींचा गल्ला जमावत नवा इतिहास रचला आहे.

मराठीसह बॉलीवूड मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळी ‘छावा’ सिनेमाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. गेल्या काही दिवसांत विकीचा सिनेमातील अभिनय पाहून अनेकांनी फोटो, व्हिडीओ शेअर करत विकीचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. अगदी बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्टने देखील तिच्या स्टोरीमध्ये विकीसाठी “तू साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आता कोणीच विसरू शकणार” असं म्हटलं होतं. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने केवळ विकीचा उल्लेख केला होता. मात्र, काही वेळाने आलियाने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी एक स्वतंत्र स्टोरी शेअर केली. यामध्ये आलिया मराठमोळ्या संतोष जुवेकरचा उल्लेख करत ‘छावा’च्या टीमचं कौतुक केलं आहे.

“अक्षय खन्ना… ऑनस्क्रीन माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक…औरंगजेबची भूमिका तू पडद्यावर अतिशय उत्कृष्टरित्या साकारली आहेस. रश्मिका तू सुंदर दिसलीयेस…तुझे डोळे फारच छान! अभिनंदन लक्ष्मण उतेकर सर…हा सुंदर सिनेमा तुम्ही बनवलात. तुम्हाला खूप प्रेम आणि तुमचं खूप कौतुक…माझ्या शुभेच्छा कायम तुमच्याबरोबर आहेत. दिनेश विजन, आशुतोश राणा, दिव्या दत्ता, विनीत सिंह, नील भूपालम, डायना पेंटी, संतोष जुवेकर, मॅडडॉक फिल्म सर्वांना शुभेच्छा!” असं आलियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरने सुद्धा ‘छावा’ सिनेमासाठी खास पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. आयुष्मान खुराना, राजकुमार राव, शर्वरी वाघ या सगळ्या कलाकारांनी विकीसह संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

Alia Bhatt Reaction On Chhaava :
आलिया भट्टची पोस्ट ( Alia Bhatt Reaction On Chhaava Movie )

दरम्यान, ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग करत बॉक्स ऑफिसवर ३३.१ कोटींची कमाई केली होती. यानंतर ‘छावा’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सहा दिवसांत २०३.६८ कोटींची कमाई करत ‘छावा’ २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा २०२५ मधील पहिला चित्रपट ठरला आहे.

Story img Loader