बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबरोबर एक खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्या घराच्या समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन गुपचूप फोटो काढणाऱ्यांवर तिने संताप व्यक्त केला आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे आलियाला पाठिंबा देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री अनुष्का शर्माने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्का शर्माने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आलियाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याबरोबर तिने तिचे मतही व्यक्त केले.
आणखी वाचा : “एखाद्याच्या खासगी आयुष्यात…” गुपचूप फोटो काढणाऱ्यांवर आलिया भट्टचा संताप, नेमकं काय घडलं?
अनुष्का शर्माची पोस्ट
“हे लोक असं पहिल्यांदाच करत नाही. साधारण दोन वर्षांपूर्वी आमचेही अशाच पद्धतीने गुपचूप फोटो काढताना आम्ही त्यांना पाहिलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांना चांगलंच सुनावलं देखील होतं. हे सर्व करुन तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात जागा निर्माण कराल, असं तुम्हाला वाटतं का? एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल, असं तुम्हाला वाटतं का? हे अतिशय लाजिरवाणे कृत्य आहे.
हे तेच लोक आहेत ज्यांना आम्ही आमच्या लेकीच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले होते. पण आम्ही इतकी विनंती करुनही त्यांनी आमच्या मुलीचे फोटो शेअर केले होते”, असे अनुष्का शर्मा म्हणाली.
आणखी वाचा : “सामान्य महिला असो किंवा…” आलिया भट्टच्याबाबतीत घडलेल्या ‘त्या’ प्रकारावर सेलिब्रेटी संतप्त
नेमकं प्रकरण काय?
आलिया भट्ट ही तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं तिला दिसलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला.
“तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे? एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. प्रत्येकाला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. पण आज मला हे म्हणावं लागतंय की तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात”, अशी पोस्ट आलियाने केली होती.