आलिया भट्ट नुकतीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकली होती आणि आता नुकतंच तिने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आलियाच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘जिगरा’ आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ‘जिगरा’मध्ये अभिनयाबरोबरच आलिया निर्माती म्हणूनही समोर येणार आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक वासन बाला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. व्हिडीओमध्ये आलिया भट्ट खांद्यावर एक बॅग घेऊन कसल्यातरी गहन विचारात उभी असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. याबरोबरच आलियाचा बॅकग्राऊंडला आवाजही ऐकायला मिळत आहे. आलियाचं पात्र तिच्या भावाशी काहीतरी बोलत असल्याचं स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा : इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणी विरोधात देव आनंद यांनी काढलेला थेट स्वतःचाच पक्ष
या चित्रपटाची कथा एक भाऊ-बहिणीच्या नात्यावर बेतलेली असल्याचं स्पष्ट होत आहे. एक बहीण आपल्या भावाच्या सुरक्षेसाठी नेमकं काय करते यावर ही कथानक बेतलेलं असण्याची शक्यता आहे. करण जोहरबरोबर आलियाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामुळे आलिया सध्या प्रचंड आनंदात आहे.
‘जिगरा’ हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय आलिया भट्ट ‘जी ले जरा’ या चित्रपटातही झळकणार आहे, ज्यामध्ये कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याही भूमिका आहेत. मात्र, प्रियांकामुळे चित्रपटाचे शूटिंगसध्या रखडले आहे. २०२३ हे वर्ष आलियासाठी खूप चांगले गेले. या वर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.