आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘राझी’, ‘गल्ली बॉय’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आलियाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असल्याने तिचं लहानपणापासूनचं चित्रपटसृष्टीशी खास नात जोडलं गेलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने वडील महेश भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्या करिअरमधील संघर्षाविषयी सांगितलं आहे.
आलिया ‘इले’शी संवाद साधताना म्हणाली, “माझे वडील महेश भट्ट यांचा संघर्ष मी फार जवळून पाहिला आहे. एका काळात त्यांचे लागोपाठ सगळे चित्रपट फ्लॉप ठरले होते. चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे त्यांच्याकडे क्वचितच पैसे असायचे. त्यामुळे ते दारुच्या आहारी गेले होते. थोडे बरे दिवस आल्यावर काही दिवसांनी त्यांनी दारू पिणं सोडलं…त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. माझ्या आई-वडिलांना करिअरच्या अशा उंचीवर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांच्या मेहनतीमुळे आज मला चांगल्या सुख-सुविधा मिळू शकल्या.”
“उद्या मला चित्रपट मिळणं बंद जरी झालं, तरी आयुष्यात मला अनेक चांगल्या संधी मिळाल्या आहेत हे मी नेहमी मान्य करेन. कधीही कोणतीही तक्रार करणार नाही. माझी आई कोणाच्याही पाठिंब्याशिवाय चित्रपटसृष्टीत आली होती. तिला तेव्हा हिंदी सुद्धा बोलता येत नव्हतं. त्यामुळे माझी आई कधी आघाडीची अभिनेत्री बनू शकली नाही. परंतु, तिने आयुष्यात प्रचंड मेहनत केली. तिच्यासाठी कोणतंही काम छोटं नसतं. अभिनय करण्याची एकही संधी न सोडता ती प्रामाणिकपणे काम करते.” असं आलियाने सांगितलं.
दरम्यान, आलियाच्या व्यावसायिक कामाविषयी बोलायचं झालं, तर सध्या ती ‘जिगरा’ चित्रपटासाठी काम करत आहे. लवकरच ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बैजू बावरा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.