अभिनेत्री आलिया भट्टने नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. अलीकडेच आलियाने तिच्यामध्ये मातृत्वानंतर झालेल्या बदलांबाबत भाष्य केलंय. आई झाल्यानंतर अभिनेत्री म्हणून भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमालीचा बदलला आहे, असं आलियाने म्हटलंय. मातृत्वाने आपल्याला खूप बदलून टाकलं आहे. पण याचा माझ्या भूमिका निवडण्यावर कसा बदल होईल, याबाबत आपण विचार करत नसल्याचं तिने म्हटलंय.
‘ऑस्कर’ आणि ‘बाफ्टा’च्या कँपेनमध्ये तिने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आई झाल्यानंतर आलेल्या अनुभवांबद्दल भाष्य केलंय. भविष्यात तिच्या चित्रपटांची निवड करण्याच्या पद्धतीवर मातृत्वाचाही परिणाम होईल का? असं विचारलं असता आलिया म्हणाली, माझ्या अभिनयातील भूमिका बदलल्या नाहीत, पण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. मला वाटतं की माझं मन पूर्वीपेक्षा थोडं अधिक मोकळं झालंय. पण मला माहीत नाही की ते काय बदल घडवून आणणार आहे. पण पुढला प्रवास कसा होतो, पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असं तिने नमूद केलं.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १४ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर २ महिन्यांनी त्यांनी आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. दोघांच्याही घरी ६ नोव्हेंबर रोजी चिमुकल्या परीचं आगमन झालं. आलियाने गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव राहा कपूर ठेवलं आहे.