अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. आता तिच्याबरोबर तिच्या लेकीचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. आलिया भट्ट लेक राहाबरोबर कधी विमानतळावर, तर कधी कपूर घराण्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये दिसते. राहा अनेकदा आई आलियाबरोबर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा लवकरच दोन वर्षांची होणार आहे. नुकताच आलियाने राहा आणि तिच्या नावामागचा एक खास किस्सा शेअर केला आहे. राहा हे नाव तिला आणि रणबीरला एका दाक्षिणात्य सिनेमाच्या सुपरस्टारच्या घरी सुचलं, असं तिने सांगितलं आहे. राहा हे नाव ऐकून त्या अभिनेत्याने आलियाला मुलगीच व्हावी अशी प्रार्थना केली होती.
आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हैद्राबादला गेली होती. तिथेच रणबीर कपूरही तिच्याबरोबर होता. याचदरम्यान दक्षिणेच्या सुपरस्टारच्या घरी डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. आलियाने हा किस्सा करण जोहरबरोबर गप्पा मारताना सांगितला आहे.
आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा नवा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती करण जोहरबरोबर एका कार्यक्रमात आली होती. यात करण आलियाबरोबर गप्पा मारत होता आणि त्यांच्यासह दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरदेखील उपस्थित होता. ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी ‘देवरा : पार्ट १’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. याचदरम्यान आलियाने लेक राहाच्या नावाचा खास किस्सा सांगितला.
काय म्हणाली आलिया?
आलिया म्हणाली, “मी आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी हैद्राबादला आलो होतो, तेव्हा तारक (ज्युनियर एनटीआर) ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या पत्रकार परिषदेसाठी आला होता. तिथेच तारकने आम्हाला त्याच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केलं. त्या दिवशी आम्ही तारकच्या घरी खूप छान वेळ व्यतीत केला. मला आठवतंय, तेव्हा रणबीर आणि मी सगळ्यांसमोर आमच्या होणाऱ्या बाळाच्या नावांची चर्चा करायला सुरुवात केली. आम्ही मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं, यावर चर्चा करत होतो.”
आलिया पुढे म्हणाली, “मुलगी झाली तर तिचं नाव ‘राहा’ ठेवू असं आम्ही ठरवलं. हे नाव ऐकल्यानंतर ज्युनियर एनटीआरने सांगितलं की, जेव्हा मी हे नाव ऐकलं, तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली की, रणबीर आणि आलियाला मुलगीच होऊ दे आणि तसंच घडलं. पुढे राहाचा जन्म झाला.”
हेही वाचा…‘लापता लेडीज’ ऑस्करला गेल्यावर मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या, “मी आनंदी, पण…”
आलिया भट्टने ज्युनियर एनटीआरच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगितलं?
आलिया भट्ट आणि ज्युनियर एनटीआरने एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. याच मुलाखतीत आलियाने ज्युनियर एनटीआरच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगितलं की, तिला ज्युनियर एनटीआरचं व्यक्तिमत्त्व खूप दरारा निर्माण करणारं वाटलं होतं. पण, सेटवर गेल्यावर तिला जाणवलं की त्याचं व्यक्तिमत्त्व अगदी उलट होतं. आलिया म्हणाली, “तारक खूप शांत आहे. आरआरआरच्या सेटवरही सीन झाल्यानंतर शांतता असायची. मला अशा शांत वातावरणाची सवय नसल्याने तारकने मला या वातावरणाशी एकरूप व्हायला मदत केली आणि जेव्हा मी सीनमध्ये डायलॉग बोलताना अडखळायचे, तेव्हाही तारक मला खूप मदत करायचा.”