Ranbir Kapoor & Alia Bhatt : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या हे जोडपं एका रोमँटिक व्हिडीओमुळे चर्चेत आलं आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे पाहूयात…
आलिया भट्ट येत्या १५ मार्चला तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाचं सेलिब्रेशन हे जोडपं अलिबागमध्ये करणार आहे. त्याआधी आलिया भट्टने प्रसारमाध्यमांबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला. आलियाच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनसाठी खास तयारी करण्यात आली होती. अभिनेत्रीने केक कापला, त्यानंतर रणबीरला केक भरवला. दोघांमधले हे गोड क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, रणबीरने केलेल्या खास कृतीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आलियाने केक कापल्यावर रणबीरने पत्नीला जवळ घेऊन तिला फोरहेडवर किस केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर गंमत म्हणून त्याने आलियाच्या नाकावर केक लावला. या कार्यक्रमादरम्यान रणबीर सतत आलियाची काळजी करताना दिसला. आलिया-रणबीरने पापाराझींबरोबर एकत्र फोटो देखील काढले. यावेळी आजूबाजूला सगळे पापाराझी असल्याने आलियाने रणबीरच्या मांडीवर बसून फोटोसाठी पोझ दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया गोड हसून सर्वांशी प्रेमाने संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आलिया-रणबीरचा हा साधेपणा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किती सुंदर व्हिडीओ आहे…रणबीर खरंच तिची नेहमी काळजी करतो”, “रणबीर आलियाच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे”, “बेस्ट…कोणाची नजर लागू नये”, “मला रणबीर-आलिया असे फार आवडत नाहीत…पण हे व्हिडीओ खरंच खूप सुंदर आहे.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, मीडियाबरोबर वाढदिवस साजरा केल्यावर आलिया-रणबीर अलिबागच्या दिशेने निघाले. लवकरच ही रिअल लाइफ जोडी प्रेक्षकांना संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये विकी कौशल देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.