जयदीप अहलावत यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. जयदीप यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वत:च्या अभिनयाबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की ते स्वतःला स्क्रीनवर पाहू शकत नाहीत, कारण स्वतःच्या अभिनयामुळे अनेकदा निराश होतात. त्यांनी आतापर्यंत फक्त ‘पाताल लोक’ सीरिज आणि ‘राझी’ चित्रपट पाहिला आहे. ‘राझी’ पाहायचा नव्हता, पण आलिया आणि मेघना गुलजार यांनी धमकी दिल्याने पाहिला होता.
‘जाने जान’ चित्रपटातील सह-कलाकार सौरभ सचदेवाबरोबर बोलताना त्यांनी ‘राझी’ चित्रपटातील त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. आयुष्यात पहिल्यांदाच कामामुळे भयानक स्वप्नं पडत होती, असा खुलासा त्यांनी केला. “कामाचा जीवनावर परिणाम होणं ही सामान्य गोष्ट आहे. मला पहिल्यांदाच ‘राझी’ चित्रपटादरम्यान भयानक स्वप्ने पडू लागली. मला कधीच भयानक स्वप्ने पडायची नाहीत. पण त्यावेळेस मी हेरगिरीच्या जगात खूप गुंतलो होतो, कारण मी या विषयावर खूप वाचलं होतं, मला भीती वाटू लागली होती. मी स्वप्नात लोकांना बंदुका आणि बॉम्बपासून पळताना पाहायचो आणि अर्ध्या रात्री उठायचो, पण कालांतराने ते कमी झालं,” असं ते म्हणाले.
आपण स्वतः केलेलं ८० टक्के काम पाहिलं नसल्याचा खुलासा त्यांनी केला. “मेघना आणि आलियाने माझा नंबर ब्लॉक करण्याची धमकी दिल्यानंतरच मी ‘राझी’ पाहिला. मी चित्रपटाच्या चौथ्या स्क्रीनिंगसाठी गेलो होतो,” असं त्यांनी सांगितलं. सेटवरील एक किस्सा सांगत ते म्हणाले की पटियाला इथं एका शेड्यूलच्या शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे जास्त वेळ नव्हता आणि त्यांना क्लोज-अप शॉट करावा लागला होता. मेघना गुलजार तो शॉट मॉनिटरवर पाहू शकल्या नाहीत. त्यांना सांगण्यात आलं होतं की ते तीन वेगवेगळे टेक शूट करतील आणि त्यांना खात्री होती की जयदीप ते खूप चांगलं करेल. पण त्यांच्या या आत्मविश्वासामुळे दबाव आला होता असं जयदीप म्हणाले.
‘राझी’ हा बॉलीवूडमधील एक सुपरहिट चित्रपट होता. पाच वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. यात तिने गुप्तहेराची भूमिका साकारली होती. यात जयदीप यांचीही महत्त्वाची भूमिका होता. जयदीप यांच्या अलीकडच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जान’मध्ये दिसले. यात विजय वर्मा आणि करीना कपूर खान हे देखील होते.