ऐतिहासिक चित्रपट, रिमेक आणि चरित्रपट हे सध्या बॉक्स ऑफिसवर हमखास यश मिळवून देणारे ठरत आहेत. हिंदी असो वा मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत बरेच बायोपिक सध्या बनत आहेत अन् आणखी काही बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कंगनाच्या ‘एमर्जन्सि’ या इंदिरा गांधी यांच्यावर बेतलेल्या बायोपिकची सध्या चांगलीच चर्चा आहे. इतरही काही विषयांवर काम सुरू आहे. मध्यंतरी अभिनेत्री मधुबालावरील बायोपिकची चर्चासुद्धा चांगलीच रंगली होती.

सौंदर्याबरोबरच मधूबाला यांच्या आयुष्यातील घडामोडींचं आणि त्यामागील कारणांचं कुतूहल प्रत्येकाला आहे. मधुबाला यांच्यावर बेतलेला बायोपिक बघायला कोणाला नाही आवडणार? आता नुकतंच याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबरोबरच मधुबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

आणखी वाचा : ‘पुष्पा २’साठी श्रेयस तळपदे डबिंग करणार का? अभिनेता म्हणाला, “माझी इच्छा आहे पण…”

सोनी पिक्चर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. मध्यंतरी प्रसिद्ध फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा हा बायोपिक करणार असून क्रीती सेनॉन यात मधुबाला यांची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर आली होती, पण मधुबाला यांच्या बहिणीने या गोष्टी खोडून काढल्या होत्या. इतकंच नव्हे तर हा बायोपिक इतर कुणीही करायचं धाडस करू नये असं वक्तव्यही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं होतं.

पिंकव्हीलाशी संवाद साधताना मधुर ब्रीज भूषण म्हणाल्या होत्या की, “एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की मधूबालावर एकच बायोपिक बनेल ज्यामध्ये माझा सहभाग असेल. मला कुणाला दुखवायचा हेतु नाही, पण मधूबालाविषयी माहिती नसलेल्या गोष्टी आम्हाला लोकांसमोर आणायला आवडेल. हा बायोपिक बनवण्यासाठी मी पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. मी आणि माझी टीम यावर काम करत आहोत, लवकरच याबद्दल अधिकृती घोषणाही करू. आम्ही सध्या यासाठी बरीच मेहनत घेत आहोत.”

आता या बायोपिकच्या घोषणेमुळे प्रेक्षक अधिक उत्सुक दिसत आहे. मधुबाला यांच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या, लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बनणारा हा बायोपिक आणखीन उत्तम आणि वास्तवदर्शी कसा होईल ते आता तो प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.

Story img Loader