ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केली आहे. चित्रपटातील हनुमानाच्या तोंडी असलेल्या संवादांवरही लोकांनी आक्षेप घेतला. निर्माते आणि लेखक यांनी हा विरोध पाहता त्यातील काही वादग्रस्त संवाद बदलायचे ठरवले. सगळीकडूनच या चित्रपटावर बंदी घालायची मागणी होत असताना अशातच ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’नेही या चित्रपटावर बंदी घालायची विनंती करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

आणखी वाचा : “हे संवाद माझे नाहीत…” ‘आदिपुरुष’मधील “तेल तेरे बाप का..” या संवादावर मनोज मुंतशीर यांचं स्पष्टीकरण

‘एएनआय’च्या वृत्तानुसार या संस्थेने हे पत्र लिहून आदिपुरुष चित्रपटाचं प्रदर्शन तातडीने थांबवून त्यावर बंदी घालायची मागणी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्याविरोधात एफआयआर करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीदेखील या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

याबरोबरच या पात्रात त्यांनी माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर अन् CBFC चे अध्यक्ष प्रसून जोशी यांचाही उल्लेख केला आहे. प्रभास, क्रीती सनॉन अन् सैफ अली खान हे तिघेही या चित्रपटाशी जोडल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप या पत्रावर सरकारकडून कोणतीही कारवाई किंवा उत्तर देण्यात आलेलं नाही. १६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ने तीन दिवसात चांगली कमाई केली असली तरी सोमवारपासून याच्या कमाईचे आकडे खाली घसरू लागले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All india cine workers association demands ban on om raut adipurush writes letter to pm modi avn